महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या प्रचंड संधी; ॲमेझॉनच्या सीईओंसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वपूर्ण चर्चा

Gramin Varta
147 Views

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील आर्थिक महासत्ता म्हणून वेगाने वाटचाल करत असून, ‘वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यामध्ये डेटा सेंटर्स, आरोग्य, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कौशल्य विकासाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांना केले. हॉटेल ताज पॅलेस येथे झालेल्या या बैठकीत दोन्ही बाजूंनी राज्यातील गुंतवणुकीच्या विविध शक्यतांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातील डेटा सेंटर हब बनले असून, डेटा सेंटरच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली पोषक परिसंस्था राज्यात उपलब्ध आहे. सार्वजनिक क्लाउड धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, डेटा सेंटरसाठी ‘ग्रीन डेटा सेंटर’ धोरणांतर्गत अपारंपारिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन आणि विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शासन व्यवस्थेत करून नागरिक सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर सरकारचा भर आहे. कृषी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतही एआयवर आधारित व्यवस्था उभारली जात आहे. विशेषतः नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या ‘मेडिसिटी’ प्रकल्पामुळे आरोग्य क्षेत्रात ॲमेझॉनसाठी गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ॲमेझॉनच्या सहकार्याने महाराष्ट्रात काम करण्यास राज्य सरकार उत्सुक आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Total Visitors :
4821050
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *