राज्यात मान्सून होणार अधिक सक्रिय; पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

Gramin Varta
119 Views

मुंबई: राज्यात मान्सूनचे आगमन होऊनही पावसाने अनेक ठिकाणी दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते, मात्र आता हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले आहेत. मान्सूनची वाटचाल आता उत्तर अरबी समुद्रासह गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू झाली असून, पश्चिमेकडील वारे मजबूत झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, हवामान विभागाने या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पेरणीला गती मिळणार असून, जळगाव आणि गोंदिया जिल्ह्यातही पावसाने दमदार आगमन केले आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असून, राज्यभरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नंदुरबारमध्येही पावसाची नोंद सुरू झाली असून, पेरणीपूर्व कामांना आता वेग आला आहे.

Total Visitors :
4576952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *