कशेडी घाटातील महामार्गाची साईड पट्टी खचली; निकृष्ट कामामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Gramin Varta
135 Views

रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाच्या जुन्या मार्गावर करण्यात आलेल्या केबल जोडणीच्या कामानंतर, रस्त्याच्या कडेची साईड पट्टी खचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी केबल टाकण्यासाठी या भागात खोदकाम करण्यात आले होते, परंतु त्यानंतर करण्यात आलेली भरावाची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

पहिल्याच पावसात ही माती वाहून गेल्याने रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. जुन्या कशेडी बंगल्यापासून भोगावपर्यंतच्या टप्प्यावर या समस्येचा सर्वाधिक फटका बसत असून, या चिखलामुळे गुरेढोरे अडकून जखमी होण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. या कामाच्या दर्जाबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित केला आहे.

कशेडी घाटासोबतच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील महामार्गाच्या अनेक भागांत साईड पट्ट्या खचल्याचे चित्र असून, रस्ते निसरडे झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने तातडीने या परिस्थितीची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Total Visitors :
4576507
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *