रत्नागिरी : कुवारबाव समाजकल्याण विभागातील साहित्य खरेदीवर प्रश्नचिन्ह; दीड लाखाची खरेदी मात्र साहित्य मुलांना मिळालेच नाही

Gramin Varta
179 Views

रत्नागिरी : समाज कल्याण विभागाच्या अखत्यारीतील कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील साहित्य खरेदीबाबत नव्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मार्च २०२४ मध्ये आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे दीड लाख रुपयांच्या साहित्याची खरेदी कागदोपत्री दाखविण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नसल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे.

माहितीनुसार, वसतिगृहासाठी पायपुसण्या, डस्टबीन, खेळाचे साहित्य, ट्यूबलाईट तसेच अंगाचे व कपडे धुण्याचे साबण आदी साहित्य खरेदी केल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात हे साहित्य उपलब्ध नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी खर्च झाल्याचे दाखविण्यासाठी ही खरेदी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या खरेदीसंदर्भात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविण्यात आली होती. मात्र, संबंधित माहिती वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच वसतिगृहाच्या तपासणीसाठी आलेल्या निरीक्षकांकडे काही विद्यार्थ्यांनी याबाबत लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी चिपळूण-खेर्डी येथील शासकीय वसतिगृहातील कथित सफाई कामाच्या बिलांबाबत तसेच समाज कल्याण विभागातील इतर आर्थिक व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता कुवारबाव येथील साहित्य खरेदीच्या प्रकरणामुळे विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील इतर शासकीय वसतिगृहांमधील खरेदी व्यवहारांचीही स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.

Total Visitors :
4577007
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *