एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यभर वृक्षारोपण उपक्रम

Gramin Varta
92 Views

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १४ जुलै रोजी राज्यभर भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘हरित भविष्यासाठी एक पाऊल पुढे’ या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालयांच्या परिसरात सुमारे १ हजार ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपण केले जाणार आहे. एसटी महामंडळाने या उपक्रमासाठी संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाचा आधार घेत निसर्ग प्रेमाचा संदेश दिला आहे. या उपक्रमात केवळ एसटीचे अधिकारी आणि कर्मचारीच नव्हे, तर सर्व सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, यानिमित्ताने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एसटीच्या या हरित उपक्रमामुळे राज्यभरातील एसटीच्या आवारामध्ये हिरवळ वाढण्यास मदत होणार असून, सामाजिक दायित्वाचे भान जपत एसटी महामंडळ या उपक्रमातून एक सकारात्मक संदेश देत आहे.

Total Visitors :
4820035
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *