हातीवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Gramin Varta
201 Views

संगमेश्वर : तालुक्यातील हातीव पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पक्ष प्रवेशाचा धडाका पाहायला मिळाला असून, हातीव मुस्लिम मोहल्ल्यातील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात जाहीर प्रवेश केला. पं.स. सदस्य मंगेश बांडागळे आणि युवक तालुका उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात रेहान गडकरी यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थांनी आमदार निकम यांच्या विचारांचे समर्थन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कारही करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम यांनी, राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे नमूद केले. गावाचा विकास, रस्ते, पाणी आणि मूलभूत सोयी-सुविधांसोबतच शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे काळाची गरज असल्याचे सांगत, जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विकासकामांच्या माध्यमातून अधिक दृढ करण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला. संगमेश्वर-चिपळूण मतदार संघात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन विकासाची गती कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पं.स. सदस्य मंगेश बांडागळे यांनी बोलताना सांगितले की, शेखर निकम यांची ओळख ही ‘जनतेची कामे करणारे आमदार’ अशी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. या कार्यक्रमाला आर.डी.सी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, उपसभापती प्रफुल्ल बाईत, हनिफ हरचिरकर, हुसेन बोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हातीव मोहल्ल्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्याने या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी काळात स्थानिक विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Total Visitors :
4576496
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *