भाजप विरुद्ध भारत संघर्षात देशभक्त जिंकले; तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरेंचा घणाघात

Gramin Varta
46 Views

दिल्ली: तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकलं नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर कॉकरोच जनता पार्टीनं (सीजेपी) दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचा परिणाम म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिला. यानंतर जंतरमंतरवर जल्लोष साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना – उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील शिवाजी पार्कात ‘अभिनंदन सभा’ घेत सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, संजय राऊत, आ. रोहित पवार यांसह उबाठा आणि मनसे यांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी उपरोक्त प्रकरणात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली आणि सर्वांनी काही वेळ मौन बाळगून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ठाकरे पुढे म्हणाले, या संघर्षात जात, पात, धर्म विसरून ‘मी भारतीय’ म्हणत आपण सर्व जण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकुमशाहला नमवलं आहे. मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री, त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांना आता देशाचं काम करायला सांगा. कारण अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत. पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. इथे देशाच्या संरक्षणाची बोंब, पण राजनाथ सिंह धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नव्हे रस्ता मंत्री, ते इथेनॉलवर बोलत आहेत. हा पुढचा विषय नक्की आहे. मोदींना मला सांगायचंय की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

जेन-झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या – राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही पेटवलेल्या आंदोलनाला यश आल्याने हा आनंद साजरा करण्यासाठी आपण येते आलो आहोत. जेन झींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे. जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले जेन-झी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे आंदोलनातून समजलं, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजलं आहे. मी संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांनी यावेळी दिल्ली पोलिसांवरही हल्लाबोल केला. दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातील फरक आता सगळ्यांना कळला असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *