भायखळा पोलीस ठाण्यात आगीचा तांडव; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

Gramin Varta
123 Views

मुंबई : भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत रविवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. हंसराज मार्गावर असलेल्या या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही.

मुंबई अग्निशमन दलाला रविवारी रात्री सुमारे ८.२४ वाजता भायखळा पोलीस ठाण्यात आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह बेस्ट प्रशासन, स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग इमारतीच्या इतर भागात पसरण्यापासून रोखली आणि काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले की, भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीत अचानक आग लागली होती. अग्निशमन दलाने वेळेत कारवाई करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

दरम्यान, प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी आणि तांत्रिक पथकाकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

Total Visitors :
4843972
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *