रत्नागिरीतील आरजू कंपनीतील फसवणुकीबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार, थकीत पैसे न मिळाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा

Gramin Varta
140 Views

रत्नागिरी : आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे पैसे भरूनही त्याची परतफेड न झाल्याचा आरोप करत फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल १२०० सदस्यांकडून अंदाजे २० ते २२ कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणातील गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत, आरोपींच्या मालमत्ता जप्त करून त्यातून रक्कम वसूल करावी, तसेच न्यायालयीन लढ्यासाठी झालेला खर्च मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ह्युमन राईट्स ऑफ प्रोटेक्शनचे जिल्हा संघटक तथा युवा सामाजिक संस्था मुचरीचे अध्यक्ष विलास वामन सुर्वे यांनी दिला आहे.

आरजू टेकसोलकडून विविध प्रकारची उत्पादने तयार करण्याचे काम देण्यात आले होते. कंपनीकडून कच्चा माल व मशिनरी उपलब्ध करून देण्यात येईल, तयार केलेल्या मालाचे पैसे ठरावीक कालावधीत खात्यावर जमा केले जातील, असे सांगण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सुरुवातीला कंपनीचे काम व्यवस्थित सुरू असल्याने अनेकांनी रोजगाराची संधी निर्माण होईल, या अपेक्षेने पैसे भरले. काहींनी दागिने गहाण ठेवून किंवा कर्ज काढून कंपनीत रक्कम भरल्याचेही निवेदनात नमूद आहे.

निवेदनानुसार, सुर्वे यांच्या ग्रुपमध्ये ३८७ सदस्य असून त्यांनी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपये भरले आहेत. तर कंपनीशी संबंधित एकूण सुमारे १२०० सदस्यांकडून २० ते २२ कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला वर्षभर मालाची व पैशांची देवाणघेवाण सुरळीत झाली. मात्र त्यानंतर सदस्यसंख्या वाढवण्यात आली आणि पुढे तयार केलेल्या मालाचे पैसे मिळणे बंद झाल्याचा आरोप आहे. कंपनीकडे मार्केटिंग तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे तयार माल परत येऊ लागला आणि आर्थिक व्यवहार विस्कळीत झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पैशांची देयके थांबल्यानंतर संबंधितांनी पोलिसांकडे धाव घेतली. ५८७ जणांनी एफआयआर दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रसाद फडके, संजय केळकर आणि सुधीर सावंत यांना अटक झाल्याचे निवेदनात नमूद आहे. तसेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले अनि ऊर्फ अमन जाधव हे फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. सायली सरफरे यांना पुराव्याअभावी सुटका झाल्याचेही निवेदनात नमूद आहे.

गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू असल्याचा दावा करत, गोदामात सील केलेला माल अद्याप लिलाव करून त्यातून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया झालेली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्याने आपली आर्थिक कोंडी आणखी वाढल्याचे सुर्वे यांनी म्हटले आहे. मुद्दलापेक्षा व्याजाचा बोजा वाढला असून, अनेकांनी दागिने गहाण ठेवून पैसे भरल्याने कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या प्रश्नासाठी तीन वर्षे उपोषण, न्यायालयीन लढा आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे सुर्वे यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारातही या प्रश्नावर दाद मागितल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, सुर्वे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीही निवेदन दिले असून, १५ ऑगस्टपर्यंत संबंधितांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या इशाऱ्याची प्रत मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री, प्रांताधिकारी आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक यांनाही दिल्याचे निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणात कंपनीकडून नेमकी किती रक्कम स्वीकारण्यात आली, किती ग्राहकांचे पैसे थकीत आहेत, न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे आणि जप्त मालाच्या विल्हेवाटीबाबत प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आहे, याबाबत आता प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे. दरम्यान, आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांची सुरक्षितता आणि कायदेशीर तोडगा यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.अशी माहिती दीपराज शिंदे यांनी दिली आहे.

Total Visitors :
4678938
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *