जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (कुणबी प्रमाणपत्र देऊन) आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा १२ वा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, रक्तशर्करा कमी झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मंडपातच सलाईन सुरू करण्यात आले आहे.
त्यांचे वजनही ५२ किलोवरून ४५ किलोपर्यंत घटले आहे. दरम्यान सरकारच्या वतीने विविध निर्णय घेत १५ पैकी १२ मागण्या आतापर्यंत मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जरांगेंना पुन्हा एकदा उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात सुमारे ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले आहेत. जात पडताळणीची १६ हजार ११० प्रकरणे निकाली काढली असून एसईबीसीची २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आलेली आहेत. जालना, हिंगोली व बीड जिल्ह्यांत एकही अर्ज प्रलंबित नाही. जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. एकूणच मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असून उपोषण मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन करत अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आता उपोषणाचा हट्ट सोडून आनंदाने सांगता करावी, असे आवाहन शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी केले. छत्रपतींच्या पुतळ्यासमोर अपशब्द बोलणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ज्योती मेटे यांनी मराठा आरक्षण आणि आरक्षणाच्या कायदेशीर बाजू मांडत जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
जरांगेंची प्रकृती खालावली, १२ मागण्या मान्य, उपोषण सोडण्याचे आवाहन
Leave a Comment







