लंडन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ प्रदान; ब्रिटनमधील उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीची हाक

Gramin Varta
91 Views

दिल्ली: पर्यावरणाचे भान ठेवूनच नवा महाराष्ट्र घडवण्याचे काम सुरू असून, ब्रिटिश उद्योजकांनी ‘ग्रीन कॅपिटल’ आणि अद्ययावत तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात पर्यावरणपूरक विकासाच्या नव्या भागीदारीसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने लंडन येथील ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘महाराष्ट्र-भारत-यूके डायलॉग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले नेतृत्व, सार्वजनिक सेवेतील योगदान आणि राज्याच्या प्रगतीसाठी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची दखल घेत बॅरोनीस गीता नारगुंड, लॉर्ड रेमिरेंजर आणि लॉर्ड रवेल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

आपल्या भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी ‘लंडनमध्ये डिझाइन करा आणि महाराष्ट्रात उत्पादन करा’ अशी नवी व्यापार भागीदारी उभी करण्याचे आवाहन ब्रिटिश उद्योगविश्वाला केले. समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्राचा विकास वेगाने होत असून, ईव्ही, हरित हायड्रोजन, फिनटेक आणि नवीकरणीय ऊर्जेमध्ये परदेशी कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दावोस येथे झालेल्या करारांपैकी सुमारे ७५ टक्के करार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित झाले असून, ‘वॉर रूम’च्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांवर थेट देखरेख ठेवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईने दक्षिण आशियातील पहिले स्वतंत्र नेट-झिरो क्लायमेट ॲक्शन प्लॅन सुरू केले असून २०३० पर्यंत राज्याची ५० टक्के ऊर्जेची गरज स्वच्छ स्रोतांतून भागवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लंडन येथील गुंतवणूकदारांच्या बैठकीत बोलताना त्यांनी जगभरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी एका विशेष ‘अपेक्स बॉडी’च्या स्थापनेचे संकेत दिले. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मराठी बांधवांच्या बाजूने सरकार ठाम असून लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारणे न दाखवता जागेवरच थेट निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनात गती आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत संपूर्ण समन्वयाने एक टीम म्हणून महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचे काम सुरू असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Total Visitors :
4837908
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *