कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाच्या भाविकांसह संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि देखभालीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून गुजरातच्या जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात उपचार घेत असलेल्या ‘माधुरी’ हत्तीणीचा मूळ मठात परतण्याचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे. उच्चस्तरीय समितीने सर्व तांत्रिक आणि आरोग्यविषयक बाबींची पडताळणी करून माधुरीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्यास अधिकृत हिरवा कंदील दाखवला आहे.
नांदणी मठातील लाडक्या माधुरी हत्तीणीच्या आरोग्याचा आणि देखभालीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर न्यायालयाच्या थेट निर्देशानुसार तिला वैद्यकीय उपचारांसाठी जामनगरच्या ‘वनतारा’ या प्राणी कल्याण केंद्रात हलवण्यात आले होते. तेथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पडली. तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याने आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होत आल्याने आता तिला पूर्ण सन्मानाने मूळ वास्तव्याच्या ठिकाणी परत आणण्याची प्रशासकीय तयारी युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
माधुरीच्या आरोग्याची आणि दैनंदिन देखभालीची मठातही काळजी घेतली जावी यासाठी खुद्द ‘वनतारा’ प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठात तिच्यासाठी सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे एक विशेष केंद्र उभारण्यात आले असून, यामुळे तिची दिनचर्या आणि वैद्यकीय व्यवस्था अत्यंत सुरक्षित व पोषक वातावरणात पार पडणार आहे. वनतारा प्रशासनाकडून उर्वरित प्रशासकीय सोपस्कार आणि कायदेशीर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होताच माधुरीची कोल्हापूरसाठी रवानगी केली जाणार आहे. आपली लाडकी हत्तीण पुन्हा मठात परतणार असल्याची वार्ता समजताच नांदणी मठातील भक्तगणांमध्ये आणि संपूर्ण कोल्हापुरात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





