रत्नागिरी : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागांतील मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम दिवस-रात्र वेगाने सुरू आहे. मात्र, यंदा वाढत्या महागाईचा मोठा फटका गणेशोत्सवाला बसला असून, कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे गणेशमूर्तींच्या दरात सरासरी २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), फायबर, रंग, वार्निश आणि सजावटीच्या साहित्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वाहतूक, वीज आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे मूर्तीचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढला असून, त्याचा थेट परिणाम विक्रीदरांवर झाला आहे. रत्नागिरीतील मूर्तीकार संदेश सागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माती आणि रंगांच्या वाढलेल्या किमतींमुळे मूर्ती बनवणे कठीण झाले असून, दरवाढ करण्याशिवाय मूर्तीकारांसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही. पूर्वी दोन हजार ते अडीच हजार रुपयांना मिळणारी गणेशमूर्ती आता तीन हजार ते बत्तीसशे रुपयांपर्यंत मिळणार आहे.
महागाईचा फटका बसूनही गणेशभक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत आहे. अनेकांनी आपल्या पसंतीच्या गणेशमूर्तींचे आगाऊ आरक्षण केले असून, घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांसाठी पारंपरिक आणि आकर्षक संकल्पनांवर आधारित मूर्ती साकारल्या जात आहेत. यंदाही पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींना नागरिकांची विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. साधेपणा, पारंपरिक स्वरूप आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या मूर्तींना अधिक मागणी आहे.
दरवाढ अपरिहार्य असली तरी मूर्तीकारांनी दर्जा आणि कलात्मकतेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. ग्राहकांना दर्जेदार व आकर्षक मूर्ती उपलब्ध करून देण्यावरच मूर्तीकारांचा भर आहे. दरम्यान, स्थानिक मूर्तीकारांनी गणेशभक्तांना केवळ स्थानिक कारागिरांकडूनच गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक कला आणि कारागिरांच्या रोजगाराला बळ देण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
