गुहागर : तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय प्रमोद धोंडू कांबळे यांचा हाडांचा सांगाडा माळरानावर आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक महिन्यांपासून त्यांचा शोध सुरू असताना अखेर त्यांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे हे मे महिन्यापासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा कोणताही मागमूस लागला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ओवळणवाडी परिसरातील माळरानावर अळंबी शोधण्यासाठी गेलेल्या एका ग्रामस्थाला मानवी हाडांचा सांगाडा दिसून आला. त्याने तात्काळ याची माहिती गुहागर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सांगाड्याजवळ आढळलेल्या कपड्यांच्या आधारे मृताची प्राथमिक ओळख प्रमोद धोंडू कांबळे अशी पटली. स्थानिकांच्या माहितीनुसार, प्रमोद कांबळे यांना अपस्माराचा (फिट्स) त्रास होता. त्यामुळे माळरानावर असताना त्यांना अचानक झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत.
गुहागर : दोन महिन्यांपासून बेपत्ता व्यक्तीचा माळरानावर आढळला सांगाडा; कपड्यांवरून पटली ओळख
Leave a Comment
