गुन्हा दाबण्याचा प्रयत्न, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
गुहागर : येथील शृंगारतळी उर्दू हायस्कूलमध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष आणि बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मजात हृदयविकार असलेल्या या विद्यार्थ्याचा गळा दाबून जमिनीवर आपटल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शृंगारी मोहल्ला, शृंगारतळी येथील रहिवासी सौ. खतिजा अल्ताफ ठाकूर यांचा १५ वर्षांचा अल्पवयीन मुलगा अरकम ठाकूर हा शृंगारी उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी शिक्षक अजीम शेख यांनी अरकम याला पाठांतर ऐकवण्यास सांगितले होते. मात्र, पाठांतर न आल्याच्या किरकोळ कारणावरून अजीम सर यांनी प्रचंड रागाच्या भरात सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला हाताने आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर क्रूरतेची सीमा ओलांडत त्यांनी अरकमचा दोन वेळा हाताने मान दाबून त्याला वर उचलले आणि जमिनीवर जोरात आपटले.
महत्त्वाची बाब म्हणजे पीडित विद्यार्थी अरकम हा जन्मजात हृदयविकाराचा रुग्ण असून त्याच्या हृदयात छिद्र आहे. त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती आधीच नाजूक आहे. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत शिक्षकाने त्याची मान दाबून खाली आपटणे हे अत्यंत जीवघेणे ठरू शकले असते. या अमानुष मारहाणीमुळे मुलाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून तो सध्या तीव्र मानसिक तणावाखाली आहे. मुलगा घरी आल्यानंतर त्याने अंगावरील जखमा दाखवत पालकांना हा प्रकार सांगितला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो पालकांनी मोबाईलमध्ये टिपले आहेत.
या गंभीर प्रकाराबाबत जेव्हा विद्यार्थ्याचे पालक शाळेत जाब विचारण्यासाठी गेले, तेव्हा मुख्याध्यापिकेने केवळ तोंडी माफी मागून हा विषय तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शाळेतील दुसरे शिक्षक कलीम वणू यांनी पालकांशी अत्यंत उद्धट, मुजोर आणि अरेरावीची भाषा वापरून वाद घातला. या घटनेनंतर पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही शिक्षकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरबदल होण्याची किंवा ते डिलीट करण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी तातडीने १ जुलै रोजीचे सकाळी १० ते ११ वाजेदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
गुहागरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण: उचलून जमिनीवर आपटले
Leave a Comment
