राजापूर/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यामध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय प्रलंबित असून, २३ जून २०२६ रोजी शासनाने हे कार्यालय रायपाटण येथे स्थापन करण्याबाबत परिपत्रक काढले होते. या निर्णयावर हरकती नोंदवण्यासाठी आज, ७ जुलै ही शेवटची तारीख होती. या पार्श्वभूमीवर पाचळ आणि परिसरातील ३५ ते ४० ग्रामपंचायतींसह स्थानिक नागरिकांनी रायपाटण येथील कार्यालयाला तीव्र विरोध दर्शवत लेखी हरकती नोंदवल्या आहेत.
पाचल तालुका कृती समितीने या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत. पाचळ हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती असून, तिथे प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अप्पर तहसीलदार कार्यालय पाचल येथेच होणे योग्य ठरेल, असा दावा कृती समितीने केला आहे. स्थानिकांचा हा विरोध आणि पाचलची सोय पाहता, शासन नक्कीच सकारात्मक विचार करेल आणि कार्यालयासाठी पाचलची निवड होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व हरकती, नागरिकांचे दावे आणि सूचनांचे संकलन करण्याचे काम विभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर यांच्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. संकलित केलेली सर्व कागदपत्रे आणि अहवाल १२ जुलैपर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आता अंतिम निर्णय शासनाच्या दरबारी असल्याने याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
