शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर अपघातांचे सत्र; सीएनजी पाईपलाईनच्या खोदकामानंतर साईडपट्ट्यांची दुरवस्था

Gramin Varta
231 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी या मुख्य रस्त्यावर सीएनजी वाहिनी नेण्यासाठी मुख्य रस्त्यालगत करण्यात आलेले खोदकाम आता वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरू लागले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेली साईडपट्टी संबंधित कंत्राटदाराकडून व्यवस्थित न बुजवल्यामुळे हा संपूर्ण रस्ता सध्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी तीव्र मागणी होत आहे.

​शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी हा मार्ग अत्यंत अरुंद आहे आणि या मार्गावरून लहान-मोठ्या वाहनांसह एसटी बस आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. सीएनजी पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी चर खोदण्यात आली होती, मात्र काम आटोपल्यानंतर ती माती केवळ वरवर ढकलून देण्यात आली. त्याचे योग्य डांबरीकरण किंवा मजबुतीकरण न केल्यामुळे सद्यस्थितीत या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. रस्ता आधीच अरुंद असल्यामुळे समोरून एखादी एसटी बस किंवा अवजड वाहन आल्यास चालकाला आपली गाडी रस्त्याखाली उतरवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, कंत्राटदाराने निष्काळजीपणे सोडलेल्या या खड्ड्यांमुळे आणि खचलेल्या मातीमुळे समोरच्या वाहनाला बाजू देताना वाहने थेट चिखलात रुतून पडत आहेत. यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत असून वाहतूक कोंडीच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.

​याच दुरवस्थेमुळे आज दुपारी उंबरे येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र जाधव हे आपल्या वाहनाने जात असताना, समोरून येणाऱ्या एका गाडीला बाजू देण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीची पुढील दोन्ही चाके रस्त्यालगतच्या भुसभुशीत चिखलात रुतली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडी चिखलातून बाहेर काढताना त्यांना आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. महेंद्र जाधव यांच्यासारख्या अनेक वाहनचालकांना दररोज अशा धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.

​संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे गरजेचे होते. मात्र, कंत्राटदाराच्या या हलगर्जी कारभारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या धोकादायक साईडपट्ट्या तातडीने खडीकरण करून योग्य पद्धतीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी वाहन चालक व प्रवाशी जनतेतून केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *