रमेश शिंदे / भडकंबा : संगमेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे मध्यवर्ती साखरपा बस स्थानक पहिल्याच पावसात जलमय झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळीच नालेसफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी बस स्थानक परिसरात साचले असून स्थानकाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक ती नालेसफाई करण्यात आली नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय बस स्थानकाच्या मुख्य शेडमध्येही पावसाचे पाणी शिरत असल्याने प्रवाशांना आसरा घेणेही कठीण होत आहे. स्थानकाच्या इमारतीवर टाकण्यात आलेले पत्र्याचे काम अपूर्ण असल्याने त्याचाही फटका प्रवाशांना बसत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन होऊनही इमारतीसमोरील काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नवीन इमारतीसमोर एसटी बसेस उभ्या करता येत नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधांचा अपेक्षित लाभ प्रवाशांना मिळत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
साखरपा बस स्थानकावरून दररोज अनेक एसटी फेऱ्या होत असताना इतर ठिकाणची बस स्थानके सुसज्ज करण्यात आली आहेत. मात्र साखरपा बस स्थानकातील अपूर्ण कामे आणि मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या अपुऱ्या कामकाजाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे.
साखरपा बस स्थानकाला पहिल्याच पावसात तळ्याचे स्वरूप; प्रवाशांचे हाल
Leave a Comment
