पुणे: उद्योगपती केतन अगरवाल हत्याप्रकरणी अटकेत असलेली मुख्य आरोपी सिया गोयल हिने पोलीस कोठडीत अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक कबुली दिली आहे. आपल्याला केतनशी लग्न करायचे नव्हते, मात्र घरच्यांसमोर हे सांगण्याचे धाडस नसल्याने, लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणेच अधिक सोपे वाटले, अशी कबुली तिने पुणे ग्रामीण पोलिसांकडे दिली आहे. केतन हेअर पॅच (विग) वापरत असल्याचा तुटपुंजा आधार घेत ती त्याचा तिरस्कार करत असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. मात्र, केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी हा दावा फेटाळून लावला असून, साखरपुड्यापूर्वीच हेअर पॅचच्या विषयाची कल्पना सिया आणि तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती, असे स्पष्ट केले आहे.
तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही महिन्यांत तब्बल ४,४०० पेक्षा जास्त वेळा फोनवरून संवाद झाला होता आणि यातूनच त्यांनी हत्येचा भीषण कट रचला होता. यापूर्वीही सियाने ३१ मे आणि १४ जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गर्दीमुळे तो फसला होता. अखेर १८ जून रोजी सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन ४०० फूट खोल दरीत ढकलून तिने निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने स्वतःच्या आणि केतनच्या मोबाईलमधील सर्व चॅट्स डिलीट केले होते, मात्र सायबर तपासाद्वारे पोलिसांनी हे सर्व मेसेज रिकव्हर केले आहेत. लग्नासाठी उदयपूरमध्ये भव्य सोहळा आयोजित केला असताना आणि चार्टर्ड विमाने बुक केलेली असताना, अशा प्रकारे अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. सध्या सिया आणि तिचा प्रियकर चेतन पोलीस कोठडीत असून, तिचा भाऊ साहिल गोयल याच्या संशयास्पद भूमिकेबाबतही पोलीस तपास करत आहेत.
