खेडमध्ये भंगार गोदामाच्या कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
325 Views

माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह भाजप नेत्यांची घटनास्थळी धाव

खेड : शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात मंगळवारी सायंकाळी एका भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी पावणेसहा वाजन्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ प्रचंड खळबळ उडाली होती. सुदैवाने, अग्निशमन दल आणि नगरपरिषदेच्या तात्काळ कारवाईमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, एक मोठा अनर्थ टळला आहे.

या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जाड्यालवाडी येथील श्री. जाड्याल यांच्या मालकीच्या भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याने मंगळवारी सायंकाळी ५.४४ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. कचऱ्याने मोठ्या प्रमाणावर पेट घेतल्यामुळे परिसरात धुराचे लोट उसळले होते. आगीचे स्वरूप पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर आणि अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या निवासी परिसराला आगीचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. नगरपरिषदेच्या पाण्याच्या टँकरच्या मदतीने आणि अग्निशमन विभागाच्या चोख समन्वयातून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी सहकाऱ्यांसह तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत भाजपा अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले आणि ओवैस चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी स्थानिक नागरिकांच्या सोबतीने प्रशासनाला मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisement -

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *