संगमेश्वर कोळंबे येथे दरड कोसळली; हायस्कुलची इमारत केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर; ४०० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!

Gramin Varta
688 Views

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात प्रशासनाची आणि संबंधित ठेकेदाराची अनास्था किती जीवघेणी ठरू शकते, याचे भीषण वास्तव आज बुधवारी (८ जुलै) कोळंबे येथे समोर आले आहे. ठेकेदाराच्या आडमुठे कामामुळे कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलच्या मागील दरड कोसळली असून, शाळेतील ४०० विद्यार्थ्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या धोक्याबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने काही दिवसांपूर्वीच प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. ठेकेदाराने खोदाई करताना शाळेच्या जवळपासची खोदाई केल्यामुळे येथील झाडे कोणत्याक्षणी इमारतीवर कोसळण्याचे शक्यता आहे. यामध्ये जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण? ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शाळा दरडीच्या तडाख्यात सापडल्याचा इशारा वारंवार देऊनही, प्रशासनाने या गंभीर विषयाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. अखेर आज दरड कोसळल्याने आता तरी प्रशासन जागे होणार का? की मोठ्या जीवितहानीची वाट पाहणार आहे? असा संतप्त सवाल आता कोळंबेवासीय उपस्थित करत आहेत. प्रशासनाने कोळंबे हायस्कुलला नोटीस जारी केली आहे. यामध्ये मुलींचे स्वच्छतागृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांची इतर ठिकाणी स्वच्छता गृहाची सोय केलेली नाही. जवळपास 150 मुली या शाळेत आहेत. तसेच या शाळा/ हायस्कूलला ही धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराने खोदाई करताना कोणतीही काळजी न घेतल्याने हायस्कूल शेजारची दोन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.

दरड कोसळल्यामुळे शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. जर आणखी दरडीचा मोठा भाग कोसळला, तर संपूर्ण शाळा इमारत गाडली जाण्याचा धोका नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही ठेकेदाराचे आडमुठे धोरण आणि प्रशासनाची ‘जैसे थे’ भूमिका यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासनाने केवळ बैठका न घेता, त्वरित दरड हटवण्याचे काम हाती घ्यावे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व जीवितहानी टाळावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *