लांजा अपघात प्रकरण :  चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कार आणि डंपरचालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
928 Views

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील अद्वैत पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या आयशर डंपरला क्रेटा कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका प्रवाशासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली.

मुंबईच्या नागपाडा येथील कुरेशी कुटुंब गोव्याहून मुंबईकडे क्रेटा कारने प्रवास करत होते. लांजा येथील अद्वैत पेट्रोलपंपाजवळ पोहोचल्यावर, कारचालक मुस्तफा अल्ताफभाई काफी याने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात कार चालवताना रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभ्या असलेल्या आयशर डंपरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात यास्मीन इरफान कुरेशी (वय ५४), फिजा अनस कुरेशी (वय २७), महम्मद इरफान इस्लाम कुरेशी (वय १५) आणि चालक मुस्तफा अल्ताफभाई काफी (वय २०) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कारमधील महम्मद अनस इरफान कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताप्रकरणी कारचालक मुस्तफा काफी आणि डंपरचालक महेश कुमार नुन्नुचैद महतो यांच्याविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपरचालकाने महामार्गावर मागील बाजूस टेल लाईट, रेडियम रिफ्लेक्टर किंवा इतर कोणतीही सूचना देणारी चिन्हे नसताना वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेवले होते, असे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी भारतीय कायदा २०२३ चे कलम १०६(१), २८१, २८५, १२५(अ), १२५(ब), १८४, १२२ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक अमोद लक्ष्मण सरंगले अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *