राज्यात २८ जूनला होणाऱ्या ‘टीईटी’ परीक्षेला सव्वा दोन लाखांहून अधिक शिक्षक बसणार; गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीची करडी नजर

Gramin Varta
13 Views

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६’ (टीईटी) यंदा २८ जून रोजी राज्यभरात पार पडणार असून, यामध्ये सध्या सेवेत असणाऱ्या सव्वा दोन लाखांहून अधिक शिक्षकांसह नियमित परीक्षार्थी अशा एकूण ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांची परीक्षा होणार आहे. या परीक्षार्थींनी पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण ६ लाख १२५ अर्ज सादर केले आहेत. राज्यातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १ हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली असून, ‘पेपर एक’साठी ७०१ केंद्रे आणि ‘पेपर दोन’साठी १ हजार २८ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

या सर्व परीक्षा केंद्रांवरील वर्ग खोल्या, प्रवेशद्वार, लॉबी आणि केंद्र संचालक कक्ष अशा सर्व संवेदनशील ठिकाणी मिळून एकूण १८ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही. यंदाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण उमेदवारांमध्ये १ लाख ९० हजार ६६९ पुरुष, २ लाख ३७ हजार ४४८ महिला आणि ५ तृतीयपंथी परीक्षार्थींचा समावेश असून, यामध्ये ७ हजार १३९ दिव्यांग उमेदवारांचाही समावेश आहे, अशी विस्तृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परीक्षेच्या अनुषंगाने बोलताना परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी सांगितले की, राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या मागील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केलेल्या एकूण २२ परीक्षार्थींची परीक्षेमधील संपादणूक परिषदेने रद्द केली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘टीईटी- २०२६’ च्या परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. तसेच पात्र परीक्षार्थींची प्रवेशपत्रे त्यांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली असून, सर्व उमेदवारांनी ती वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत आणि परीक्षेच्या दिवशी होणारी ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी आपल्या परीक्षा केंद्राचा पत्ता अगोदरच व्यवस्थित माहिती करून घ्यावा. परीक्षेच्या वेळेबाबत माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, ‘पेपर एक’साठी उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी १०.१० नंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नसून, प्रत्यक्ष परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या कालावधीत पार पडेल, त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *