गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी लाईनमन नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित
वेळोवेळी मागणी करूनही जाणून बुजून दुर्लक्ष?
रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी गावासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचा कायमस्वरूपी लाईनमन उपलब्ध नसल्यामुळे वीजेसंबंधी अनेक प्रश्न गंभीर प्रलंबित झाले आहेत. परिणामी, ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण प्रशासनाकडून या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उक्षी गावामध्ये वीज पुरवठ्याबाबत सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, स्थानिक पातळीवर तातडीने लक्ष देणारी यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. विशेषतः मुस्लिम मोहल्ल्यामध्ये महावितरणचे एक वीज मीटर सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत लोंबकळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या उघड्या व लोंबकळत्या मीटरमध्ये पावसाचे पाणी जाऊन केव्हाही मोठी दुर्घटना किंवा शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या अत्यंत धोकादायक परिस्थितीची व संबंधित मीटरच्या छायाचित्रांची ग्रामस्थांनी महावितरणच्या संबंधीत अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष पुराव्यासह माहिती दिली होती. मात्र, वारंवार गाऱ्हाणे मांडून आणि विनंत्या करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही, हे विशेष.
शासकीय यंत्रणेच्या या उदासीन कारभाराबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अधिकारी आणि कर्मचारी लक्ष देत नसल्याने उद्या जर वीज पुरवठ्याबाबत काही मोठी दुर्घटना किंवा समस्या निर्माण झाली, तर दाद मागण्यासाठी नेमके कोणाकडे जायचे? असा संतप्त सवाल उक्षीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाची व नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घ्यावी, आणि उक्षी गावात तातडीने कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करून संभाव्य मोठा अनर्थ टाळावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.






