रत्नागिरी : राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घोषित करण्यात आलेल्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे. यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’ (AgriStack Farmer ID) नोंदणी व आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राम कुलकर्णी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ७ हजार ९४ कर्जखाती पहिल्या टप्प्यात पात्र
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ३११ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेली व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्जखात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह कमाल २ लाख रुपये पर्यंतची थकबाकी असणारी एकूण ७ हजार ३३३ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
यापैकी पहिल्या टप्प्यातील ७ हजार ९४ पात्र कर्जखात्यांची यादी लवकरच शासन स्तरावरून प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर याद्या पुढील ठिकाणी उपलब्ध केल्या जातील. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांची कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा, तलाठी कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालये.
शासनाकडून पात्र कर्जदारांच्या खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम थेट जमा करण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (AgriStack Farmer ID) नोंदणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरित पुढील ठिकाणी जाऊन नोंदणी पूर्ण करावी. आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, सी.एस.सी. (CSC) केंद्र.
या नोंदणीमुळे याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊन कर्जमुक्तीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणे सुलभ होईल.
योजनेबाबत काही शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय,रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ची जवळची शाखा, गावातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा.






