महाड: महाड तालुक्यातील आकले गावाजवळ काळ नदीच्या पात्रात मुसळधार पावसामुळे अडकलेल्या दोन तरुणांची एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आदिल शकील खान आणि नशीमुल्ला यतिमुल्ला खान हे दोन तरुण बुधवारी सायंकाळी काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरण्यासाठी गेले होते. मात्र, परिसरात अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि हे दोन्ही तरुण बेटावरच अडकून पडले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यासाठी एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाला पाचारण केले. रात्रीचा अंधार आणि नदीचा वेगवान प्रवाह अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बचाव पथकाने अत्याधुनिक साधनसामग्री व बोटींच्या सहाय्याने नियोजनबद्ध मोहीम राबवून दोन्ही तरुणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
या मोहिमेत एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत सेठी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोलाची कामगिरी बजावली. सध्या पावसाळा सुरू असल्याने नदी, ओढे व धबधबे धोक्याचे बनले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रातील बेटांवर जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा पुराच्या पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे सूचित केले आहे.
