मुंबई: राज्यातील बहुतांश भागांत पावसाने आता काहीशी उघडीप घेतली असून, २० जुलैपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर मान्सून आता पुन्हा सुप्त स्थितीत गेला आहे. राज्यात हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असून, तिसऱ्या आठवड्यात केवळ काही भागांतच पावसाच्या सरी कोसळू शकतात, परंतु मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. दिलासादायक बाब म्हणजे केवळ कोकण किनारपट्टीवर १६ ते १८ जुलैदरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदाच्या पावसाळ्याबाबत ‘अल निनो’चा प्रभाव जाणवेल, असे भाकीत सुरुवातीला काही शास्त्रज्ञांनी केले होते, मात्र १ ते ९ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने या भाकितांना छेद दिला. आता तज्ज्ञांनी ‘इंडियन ओशियन डायपोल’ (आयओडी) या घटकावर आधारित नवीन अंदाज वर्तवला आहे. हा ‘आयओडी’ घटक ‘अल निनो’चा प्रभाव कमी करण्यास मदत करून भारतीय उपखंडात चांगल्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतो, असा विश्वास अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हा ‘आयओडी’ जुलैअखेर अंशतः सक्रिय होणार असून, ऑगस्ट महिन्यात तो अधिक जोरदारपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती सुधारून शेतीला आणि धरणांमधील पाणीसाठ्याला मोठा आधार मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भाग पावसाच्या प्रतीक्षेत असला तरी, आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत दिलासादायक मानले जात आहेत.
