रघुवीर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; एसटी बस अडकल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला

Gramin Varta
128 Views

खेड: रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाला. घाटात डोंगराचा मोठा भाग खचून दरड आणि माती रस्त्यावर आल्याने सातारा-रत्नागिरी दरम्यानचा संपर्क पूर्णपणे तुटला. या घटनेमुळे खेड आगाराची एक एसटी बस दीड तासांपासून घाटात अडकून पडली होती, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्या आठवड्यात याच परिसरात दरड कोसळून रस्ता वाहून गेला होता. प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केली असली, तरी आजच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा घाटात बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केले असून, रस्त्यावरून पाण्याचा मोठा लोंढा वाहत आहे. अशा परिस्थितीत खेड-अकलपे एसटी बस घाटात अडकल्याने त्यातील शालेय विद्यार्थी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरीशी असलेला थेट संपर्क तुटला आहे. रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूंच्या वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात असली, तरी संततधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने रघुवीर घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *