खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नद्यांचा रौद्र अवतार; बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत

Gramin Varta
449 Views

खेड: रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खेड तालुक्यात गंभीर पूरस्थिती निर्माण केली आहे. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि सायंकाळपर्यंत तिची पाणीपातळी ९.८० मीटरपर्यंत पोहोचली. नदीचे पाणी थेट खेड शहरातील मटण-मच्छी मार्केट, तीनबत्ती नाका, वाल्की गल्ली, निवाचा चौक, पान गल्ली आणि पोत्रिक मोहल्ला यांसारख्या सखल भागात शिरले. अचानक वाढलेल्या पाणीपातळीमुळे व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आणि अनेक दुकानदारांना आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीही मिळाली नाही. संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने सकाळपासूनच तीन वेळा सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले.

नारंगी नदीच्या पुराचा फटकाही जनजीवनाला बसला आहे. सुर्वे इंजिनिअरिंगजवळील नवीन मोरीवरून पाणी वाहत असल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील दळणवळण बंद झाले आहे. खेड-खाडीपट्टा आणि सुसेरी मार्गावरील पुलांवरूनही पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे परिसरातील हजारो हेक्टर भातशेती जलमय झाली असून, नदीकाठावरील स्मशानभूमी आणि वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या पूरस्थितीचा मोठा फटका एसटी महामंडळाच्या सेवेलाही बसला असून मुंबई-बोरिवलीसह ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खांबतळे झोपडपट्टीतील ४५ नागरिकांना सम्राट अशोक नगर येथील बालवाडी इमारतीत सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने प्रशासनाने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. नागरिकांनी नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *