कंत्राटी ठेकेदाराच्या वाहन चालकालाच ‘सुरक्षा रक्षक’ बनवून मानधन लाटले?
रत्नागिरी: चिपळूण शासकीय वसतिगृहातील २४ लाखांच्या सफाई घोटाळ्यानंतर आता रत्नागिरीत समाज कल्याण विभागाचा नवा कारनामा उघडकीस आला आहे. एका खासगी वाहनाच्या चालकालाच कागदोपत्री ‘सुरक्षा रक्षक’ दाखवून शासकीय मानधन लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. चिपळूण-खेर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात सफाई कामगार नसतानाही सुमारे २४ लाखांची बोगस बिले लाटल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या या महाघोटाळ्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, आता समाज कल्याण विभागाचा आणखी एक नवा आणि तितकाच धक्कादायक कारनामा समोर आला आहे. या विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे दाखवणारी एक नवी माहिती आता हाती आली आहे.
चिपळूण येथील वसतिगृहात तब्बल चार वर्षे एकही सफाई कामगार उपलब्ध नसताना, केवळ कागदोपत्री घोडे नाचवून खासगी कंपनीने लाखो रुपये लाटले. धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्षात तेथील सुरक्षारक्षक साफसफाईचे काम करत होता आणि सफाईच्या नावावर मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय निधीवर दरोडा टाकला जात होता. हा संपूर्ण प्रकार माहिती अधिकाराच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२४ मध्ये चव्हाट्यावर आला. एका सजग कर्मचाऱ्याने लेखी पत्राद्वारे वरिष्ठ प्रशासनाला याची कल्पना देऊनही याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करण्यात आली.
चिपळूणच्या या प्रकरणाचा तपास सुरू होण्यापूर्वीच, आता रत्नागिरी मुख्यालय स्तरावरून आणखी एक मोठा गैरव्यवहार समोर येत आहे. समाज कल्याण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वाहनांचा (गाड्यांचा) ठेका एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आला आहे. या कंत्राटदाराच्या गाडीवर चालक (ड्रायव्हर) म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा वापर करून प्रशासकीय निधी कसा लाटला जातो, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराच्या गाडीवरील चालकाला चक्क ‘सुरक्षा रक्षक’ म्हणून कागदोपत्री दाखवले गेले आहे. एकाच व्यक्तीला चालक आणि सुरक्षा रक्षक अशा दोन वेगवेगळ्या पदांवर दाखवून, त्याच्या नावावर सुरक्षेचे अतिरिक्त पैसे नियमितपणे लाटले जात आहेत. शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली करून सुरू असलेला हा प्रकार केवळ ठेकेदाराच्या मर्जीने होणे शक्य नसून, याला विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित लिपिक वर्गाचा पूर्ण वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.
चिपळूण येथील वसतिगृहातील २४ लाखांचा बोगस बिले घोटाळा आणि आता रत्नागिरीतील खासगी गाडीच्या चालकाला सुरक्षा रक्षक दाखवून निधी लाटण्याचा प्रकार, या दोन्ही घटनांवरून समाज कल्याण विभागातील कंत्राटी पद्धतीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे हे स्पष्ट होते. एका बाजूला जिल्ह्यातील इतर सात शासकीय वसतिगृहांच्या कारभारावर संशयाची सुई असताना, दुसरीकडे विभागाच्या वाहनांच्या ठेक्यामध्येही असाच घोळ सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.
या नव्या प्रकारामुळे रत्नागिरीतील स्थानिक नागरिक आणि जागरूक जनतेमधून प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त होत आहे. शासकीय निधीचा असा अपहार करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप मोकाट असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. समाज कल्याण मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत, तसेच शासकीय निधी हडप करणाऱ्यांना तात्काळ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चिपळूण पाठोपाठ आता रत्नागिरी समाज कल्याण विभागातील कारनामे उघड
Leave a Comment
