वाटद खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र धोकादायक: आठ दिवसांत स्थलांतर न केल्यास आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
320 Views

खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांचे जि. प. ला निवेदन

गणपतीपुळे/ वैभव पवार: रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत असून, कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. पुढील आठ दिवसांत आरोग्य केंद्र सुरक्षित इमारतीत स्थलांतरित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
१९८६ मध्ये सुरू झालेल्या या आरोग्य केंद्राच्या इमारतीची गेल्या ४० वर्षांत कोणतीही मोठी डागडुजी किंवा दुरुस्ती झालेली नाही.

सद्यस्थितीत इमारतीचा स्लॅब कमकुवत झाला असून पिलरही नादुरुस्त झाले आहेत. पावसाळ्यात भिंतींतून पाणी झिरपत असल्याने विद्युत यंत्रणेत बिघाड होत आहे. गेल्या दोन वर्षांत छताचे पत्रे उडून गेल्याच्या आणि कर्मचाऱ्यांना विजेचे धक्के बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य सेवा देणे जीवघेणे ठरत आहे.

या परिसराच्या आसपास मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य केंद्रात दररोज १५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात, तर महिन्याकाठी नऊहून अधिक प्रसूती येथे होतात. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता येथे सुविधांचा मोठा अभाव आहे. कंत्राटी पद्धतीवरील डॉक्टरांपैकी एकाने अनियमित वेतनाचा कंटाळा येऊन राजीनामा दिला आहे, तर अनेक कर्मचारी पदे रिक्त आहेत. तसेच, औद्योगिक क्षेत्र असूनही येथे एक्सरे, सोनोग्राफी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

शासनाने तातडीने दखल घेऊन हे आरोग्य केंद्र दुसऱ्या सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करावे आणि नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. औद्योगिक क्षेत्राचा विचार करता येथे अद्ययावत आरोग्य यंत्रणा उभारावी. प्रशासनाने आठ दिवसांत निर्णय न घेतल्यास, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुर्लक्षामुळे समस्त नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *