संगमेश्वरमध्ये वैद्यकीय कचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट; गणेश घाट परिसरातील प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Gramin Varta
104 Views

संगमेश्वर : गद्रे यांच्या समोरील गणेश घाट परिसरात वैद्यकीय कचऱ्याचा ढीग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सलाईनच्या बाटल्या, वापरलेल्या सिरींज, इंजेक्शनच्या सुया आणि काचेच्या बाटल्यांसारखा घातक कचरा उघड्यावर टाकल्यामुळे या परिसरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे वैद्यकीय कचरा फेकल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली असून, यामुळे संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

सयाजी हळदणकर या जागरूक नागरिकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली, त्यानंतर अजिंक्यराज सुर्वे यांनी तत्परता दाखवत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधला. ग्रामसेवक आणि अनिल तांबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या कचऱ्याच्या संपर्कात लहान मुले किंवा परिसरातील गुराढोरे आल्यास त्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत नावडी ग्रामपंचायतीने परिसरातील सर्व दवाखाने आणि मेडिकल चालकांना कडक सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय कचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट लावू नये, असे बजावत ग्रामपंचायतीने संबंधितांना लेखी नोटिसा बजावल्या आहेत. ग्रामपंचायतीने केलेल्या या त्वरित कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे कायद्याने बंधनकारक असतानाही, अशा प्रकारची बेजबाबदार वर्तणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *