कृषी दिन विशेष: आंबेवाले केतकर ते ‘उद्यानपंडित’: भिल्यातील धनंजय केतकर यांचा शेतीतील यशस्वी लढा

Gramin Varta
91 Views

“शेती तोट्याची आहे आणि त्यात आता काही उरले नाही,” असे म्हणणाऱ्यांच्या कानशिलात लगावणारी यशस्वी यशोगाथा म्हणजे चिपळूण तालुक्यातील भिले येथील धनंजय केतकर यांचा कृषी प्रवास होय. केवळ ४५ हापूस आंब्याच्या कलमांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ६ हजार आंब्यांच्या डोलणाऱ्या बागेपर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या या अथांग मेहनतीची आणि शेतीतील योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांना एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ‘उद्यानपंडित’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. भिले गावच्या मातीत ‘आंबेवाले केतकर’ म्हणून प्रसिद्ध असणारे धनंजय केतकर आता राज्यभर ‘उद्यानपंडित’ म्हणून ओळखले जात आहेत.

या बागेची मुहूर्तमेढ १९७३ मध्ये केतकर यांच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी रोवली होती. कुटुंबातील पुढच्या पिढीने हा वारसा अत्यंत निष्ठेने आणि अखंड परिश्रमांतून पुढे चालवला. आज त्यांच्या १२० एकर क्षेत्रावर पसरलेल्या या बागेत तब्बल ६ हजार आंब्यांची कलमे असून, त्यापैकी साडेतीन हजार कलमे व्यावसायिक उत्पादन देत आहेत. आंब्यासोबतच त्यांनी दीड हजार काजूची झाडे लावली आहेत, तर १० ते १२ एकर जमिनीवर भात व कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. केतकर यांच्या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देऊन सेंद्रिय शेतीचा मंत्र स्वीकारला आहे. गांडूळ खत, शेणखत, जिवामृत आणि गोकृपामृत यांच्या वापरामुळे त्यांनी आपली जमीन सुपीक ठेवली आहे. यासाठी त्यांनी देशी गाई व म्हशींचे पालन केले असून, त्यांच्या दुग्धोत्पादनाचा उपयोग शेतीला सेंद्रिय खत पुरवण्यासाठी होतो. विशेष म्हणजे, त्यांनी आपली ‘नो दलाल’ पॉलिसी कायम ठेवत आपला दर्जेदार आंबा कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांना विकण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो आणि ग्राहकांचा विश्वासही टिकून राहतो.
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी गवत कापणी यंत्र, पॉवर स्प्रे आणि ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे.

१०० टक्के फलोत्पादनाचा लाभ घेत त्यांनी आज आपल्या शेतीवर सुमारे ७० स्थानिक आणि नेपाळी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्याच्या काळात मोफत धान्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असला तरी, शेती हाच देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा खरा कणा आहे, असे धनंजय केतकर ठामपणे सांगतात. प्रामाणिक प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती आजही अत्यंत फायदेशीर आहे, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. आजच्या काळात निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत त्यांनी घेतलेली ही झेप कोकणातील आणि राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. आंबेवाले केतकर ते उद्यानपंडित हा प्रवास म्हणजे जिद्द आणि मेहनतीतून कृषी क्षेत्रात घडवलेली एक छोटीशी क्रांतीच आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *