देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरातील तीन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेली ही घरे काही दिवसांपासून बंद होती. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरात सामानाची उचकापाचूक करून मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, युद्धपातळीवर पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पंचनामा पूर्ण झालेला नसल्याने चोरीला गेलेल्या सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड यांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही, तरीही चोरीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी साडवली येथे अशाच प्रकारे एका रात्रीत अनेक घरे फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता, मात्र त्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. याचप्रमाणे साखरपा येथेही एका बंद बंगल्यातून लाखांचा ऐवज लंपास झाला होता, ज्याचा तपासही अद्याप प्रलंबित आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा देवरूख शहराकडे वळवल्याने पोलीस यंत्रणेसमोरील आव्हाने वाढली आहेत.
शहरातील गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला उघड आव्हान दिले आहे. चोरट्यांनी घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. सध्या देवरूख पोलीस या चोरीच्या घटनेचा कसून तपास करत असून, शहरात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
