आरवलीत मद्यधुंद ट्रक चालकाचा थरकाप; भरधाव ट्रक पलटी

Gramin Varta
10 Views

संगमेश्वर/ नियाज खान: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. हा ट्रक अचानक विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तो थेट विरुद्ध लेनमध्ये शिरून रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडला. अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला. ट्रक चालकाला बाहेर काढले असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता, अशी संतप्त भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *