रत्नागिरी : मुक्या प्राण्यावरील कथित अत्याचार रोखण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी परिसरात घडली आहे. कुत्र्याला मारण्यास विरोध केल्याच्या रागातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रतन शिंदे (वय २३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. साळवी स्टॉप) हे १५ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांच्या घरासमोर बसले होते. यावेळी परिसरातील एका कुत्र्याला आरोपी विशाल विलास शिंदे (वय २५, रा. साळवी स्टॉप) याने हाकलून लावल्याने तो भुंकू लागला.
यानंतर संशयित आरोपीने संबंधित कुत्र्याला दगड मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी अर्जुन यांनी मुक्या प्राण्याला मारू नये, अशी समज देत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर संशयित आरोपीने घरातून धारदार सुरी आणून अर्जुन यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना मारहाणही करण्यात आल्याची नोंद तक्रारीत आहे.
या घटनेप्रकरणी अर्जुन शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुक्या प्राण्याला मारू नकोस सांगितल्याचा रागातून तरुणावर सुरीने हल्ला; कुवारबाव येथील घटना
Leave a Comment
