Category: बातम्या

  • रत्नागिरी जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अन्वी घुग यांची ‘डीआरपी’पदी निवड

    रत्नागिरी जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी अन्वी घुग यांची ‘डीआरपी’पदी निवड

    रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्ह्याला एक नवीन जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) मिळाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांच्या कार्यालयाने १६ जून २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सौ. अन्वी महेंद्र घुग यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

    कृषी उद्योग भवन, मिरजोळे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या २ जून २०२५ रोजीच्या मंजूर टिपणीनुसार, सौ. अन्वी घुग यांच्या बायोडेटा आणि मुलाखतीतील कामगिरीची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

    सौ. घुग यांच्यावर या योजनेंतर्गत वैयक्तिक आणि गट सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना विविध पातळ्यांवर मदत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन पोर्टलवर (htpps://pmfme.mofi.gov.in) नोंदणी करणे, अर्ज भरणे, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, बँक कर्ज मिळवण्यासाठी सहाय्य करणे, तसेच उद्योग आधार, फूड लायसन्स (FSSAI), वस्तू व सेवा कर (GST) नोंदणी आणि इतर आवश्यक परवाने मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे यांचा समावेश आहे.

    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • रत्नागिरी : भगवती जेटी आणि भाटे किनार्‍याजवळून हवामान अंदाज देणारे महत्त्वाचे ‘वेव्ह रायडर बोया’ बेपत्ता

    रत्नागिरी : भगवती जेटी आणि भाटे किनार्‍याजवळून हवामान अंदाज देणारे महत्त्वाचे ‘वेव्ह रायडर बोया’ बेपत्ता

    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती जेटी आणि भाटे समुद्राजवळ समुद्रातील हवामानाची माहिती देणारे ‘वेव्ह रायडर बोया’ हे तरंगते उपकरण काही दिवसांपासून बेपत्ता झाले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र (INCOIS), भू-विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि जी. एम. वेदक महाविद्यालय, तळा-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपकरण बसवण्यात आले होते. त्सुनामी, वादळे, वाऱ्याची दिशा आणि समुद्रातील लाटांची माहिती देऊन मच्छीमार बांधवांना तसेच किनारपट्टीवरील रहिवाशांना संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देण्यास हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते.

    गेल्या काही दिवसांपासून या ‘वेव्ह रायडर बोया’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यातून माहिती मिळणे बंद झाले आहे, तसेच त्याचे जीपीएस (GPS) देखील बंद आहे. यामुळे ते उपकरण त्याच्या निश्चित ठिकाणाहून वाऱ्याच्या आणि लाटांच्या प्रवाहामुळे इतरत्र वाहून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    समुद्रातील हवामानाचे अचूक अंदाज वर्तवण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त असल्याने, ते शोधणे महत्त्वाचे आहे. हे उपकरण मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करते.
    तरी, हे तरंगते उपकरण कोणालाही आढळल्यास, त्याची माहिती तात्काळ प्रकल्प अधिकारी डॉ. बी. जी. भवरे (मो. ९८२२६२०४२१) किंवा श्री. भरत कुमार (INCOIS मो. ०८१२१३१७१९४) यांच्याशी संपर्क साधून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या उपकरणाच्या शोधात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • मार्लेश्वर मंदिरात आता ड्रेस कोड आणि वेळेत बदल; देवस्थान समितीचा महत्त्वाचा निर्णय

    मार्लेश्वर मंदिरात आता ड्रेस कोड आणि वेळेत बदल; देवस्थान समितीचा महत्त्वाचा निर्णय

    संगमेश्वर: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील देवस्थान समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वपूर्ण नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये मंदिराचे पावित्र्य जपण्याच्या उद्देशाने भारतीय संस्कृतीला साजेसा पोशाख (ड्रेस कोड) अनिवार्य करण्यात आला असून, पावसाळ्यातील संभाव्य धोके आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दर्शनाच्या वेळेतही बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    श्री मार्लेश्वर देवस्थान समितीने केलेल्या आवाहनानुसार, आता मंदिरात दर्शनासाठी येताना भाविकांना हिंदू परंपरेला अनुसरून, सुसंस्कृत आणि अंगभर वस्त्र परिधान करणे बंधनकारक असेल. मंदिराच्या परिसरातील पावित्र्य आणि लाभलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकून राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

    विशेषतः पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करून, देवस्थान समितीने दर्शनाची वेळ निश्चित केली आहे. यापुढे, श्री मार्लेश्वर मंदिर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच भाविकांसाठी खुले राहील. सायंकाळनंतर उद्भवू शकणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने सांगितले आहे.
    तरी सर्व भाविकांनी या नवीन नियमांचे पालन करून श्री मार्लेश्वर देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मंदिराची पावित्र्यता जपली जाईल, तसेच भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • ‘विथ आर्या, दोन घास’ संस्थेकडून श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

    ‘विथ आर्या, दोन घास’ संस्थेकडून श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

    जाकादेवी/वार्ताहर: रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप (मुंबई) संचलित श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय, कसोप फणसोप येथील गरजू विद्यार्थ्यांना ‘विथ आर्या, दोन घास’ या स्वयंसेवी संस्थेकडून आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर, छत्र्या आणि इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड यांसारख्या वस्तूंचा समावेश होता.

    ‘विथ आर्या, दोन घास’ ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करत आहे. विशेष म्हणजे, सॅनिटरी पॅड हे या संस्थेचे स्वतःचे उत्पादन असून, त्याचे वाटप सर्वप्रथम श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना करण्यात आले.

    या प्रसंगी जीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर साळवी, ज्येष्ठ शिक्षक मारुती चौगले, संतोष डोळे, रमा जोशी, साधना कुलकर्णी, आरोही गुरव हे उपस्थित होते. तसेच ‘विथ आर्या, दोन घास’ एनजीओ संस्थेच्या संस्थापक शीतल भाटकर, विशू बडगेरी, रिया भाटकर, हर्षद भाटकर, केतकी माहीमकर, राज जैन, शालिनी गोसालिया यांसह संस्थेचे अनेक सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

  • रत्नागिरीत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत जागतिक योग्य दिन उत्साहत साजरा

    रत्नागिरीत विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत जागतिक योग्य दिन उत्साहत साजरा

    रत्नागिरी/तुषार पाचलकर: आज जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलामार्फत उद्यम नगर येथील नाईक हॉल येथे “योग अभ्यास व योग प्रात्यक्षिके” कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, मा. श्री. संजय दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पतंजली निरामय योग संस्था, रत्नागिरी येथील योगशिक्षक श्री. कीर्तीकुमार औरंगाबादकर, श्री. वीरु स्वामी आणि संस्थेतील ३५ सहकाऱ्यांनी उपस्थितांना योग व प्राणायामबाबत विविध प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय दराडे यांनी आपल्या संबोधनात, योगाला केवळ एक सराव न मानता, जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले. दररोज २०-३० मिनिटे योगासाठी समर्पित केल्यास निरोगी आणि तणावमुक्त आयुष्य जगता येईल, असा मौलिक सल्ला त्यांनी यावेळी दिला.

    या कार्यक्रमात विद्यार्थी, नागरिक आणि रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार अशा एकूण ३०० जणांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी परि. पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. तत्पूर्वी, २० जून २०२५ रोजी श्री. संजय दराडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यास भेट देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांची “गुन्हे आढावा बैठक” घेऊन त्यांना योग्य सूचना आणि मार्गदर्शन केले होते.

  • उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या सौ.नेत्रा कामेरकर यांचा पोलीस महानिरीक्षकांतर्फे सत्कार

    उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या सौ.नेत्रा कामेरकर यांचा पोलीस महानिरीक्षकांतर्फे सत्कार

    रत्नागिरी/ समीर शिगवण : पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास आणखी जोमाने काम करतील. आपल्या कार्यप्रती प्रामाणिक राहतील, या उदात्त हेतूने पोलिस कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी पोलिस अधीक्षकांनी सत्कार करण्याचे ठरवले आहे. कमी कालावधीत गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा होईपर्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या पोलिसांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. यानिमित्ताने संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल (म पोहवा) नेत्रा कामेरकर यांच्या प्रशंसनीय कामगिरीची दखल घेत विशेष महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

    नेत्रा कामेरकर या संगमेश्वर पोलिस ठाण्यात कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहत आहेत. आरोपीवर विनयभंग (मोबाईलवर बोलून अश्लील वर्तन) आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचेवर अनेक जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे होते. त्याला गुजरात येथुन पकडण्यात संगमेश्वर पोलीसाना यश आले होते. या 354 गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा होण्यासाठी कामेरकर यांनी गुन्हा शाबीत करण्याच्या उद्देशाने एका महिलेला न्याय मिळवुन देण्यासाठी साक्षीदार आणि फिर्यादी यांना मार्गदर्शन केले होते. 354 गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक झावरे करत होते. तसेच पोहेकाॅ प्रशांत मसुरकर यांनी रायटर म्हणुन कामकाज केले होते. कलम ३५४ सह इतर कलमांखालील एका गुन्ह्यात आरोपीला कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेत्रा कामेरकर यांच्या उत्कृष्ट उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. २० जून २०२५ रोजी रत्नागिरी येथे झालेल्या या सोहळ्यात, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीने हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

    प्रशस्तीपत्रात नमूद केल्यानुसार, श्री. कामेरकर यांनी आपल्या तपास कौशल्याने आणि अथक प्रयत्नांनी या गुन्ह्याची यशस्वीपणे उकल केली. त्यांच्या प्रामाणिक आणि चोख कामगिरीमुळेच आरोपीला न्यायालयाकडून शिक्षा झाली आणि न्याय प्रस्थापित झाला.

    यावेळी बोलताना, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कामेरकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, कामेरकर यांनी बजावलेली ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उज्वल झाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावून पोलीस दलाचे नाव उज्वल करतील, असा आम्हास पूर्ण विश्वास आहे.”

    विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनीही कामेरकर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    श्री. एस.एस. कामेरकर यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाची मान उंचावली आहे आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

  • राजापुरात एसटी डेपोबाहेर अवैध दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा

    राजापुरात एसटी डेपोबाहेर अवैध दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा

    तुषार पाचलकर / राजापूर: शहरातील एसटी डेपो परिसरात १८ जून २०२५ रोजी, रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करत अवैध दारूची विक्री करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. राजापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका तरुणावर दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश विश्वनाथ पवार (वय २०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई संदीप रामचंद्र कुंभार यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, दिवटेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील रहिवासी असलेला प्रथमेश विश्वनाथ पवार (वय २०) हा एसटी डेपोबाहेर असलेल्या एका टपरीच्या आडोशाला अवैध दारूसह पोलिसांना आढळून आला. प्रथमेश पवार याच्या ताब्यातून १७०० रुपये किमतीचा, गोवा बनावटीच्या ‘रिझर्व्ह सेव्हेन’ कंपनीच्या दारूचा एक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. या बॉक्समध्ये ७५० मिली मापाच्या काचेच्या ५ सीलबंद बाटल्या होत्या, ज्या प्रत्येकी ३४० रुपये किमतीच्या आहेत. ही दारू तो बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून होता.

  • महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या ‘आवर्त’ नाटकाला प्रथम पुरस्कार

    महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाच्या ‘आवर्त’ नाटकाला प्रथम पुरस्कार

    रत्नागिरी: महावितरणच्या कोकण परिक्षेत्रातील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा नुकत्याच जळगाव येथे पार पडल्या. या स्पर्धेत रत्नागिरी परिमंडलाने सादर केलेल्या ‘आवर्त’ या नाटकाने प्रथम पुरस्कार पटकावत विजेतेपदाचा मान मिळवला.

    यावेळी विजेत्या नाट्यमंडळासोबत संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी छायाचित्र घेतले. तसेच, मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ, आय. ए. मुलाणी, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. रत्नागिरी परिमंडलाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.