Category: बातम्या

  • अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हातलोट घाट रस्ता सहा वर्षे रखडला; योगेश कदमांच्या बैठकीनंतर कामाला गती

    अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हातलोट घाट रस्ता सहा वर्षे रखडला; योगेश कदमांच्या बैठकीनंतर कामाला गती

    खेड (प्रतिनिधी) : खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा हातलोट घाट रस्ता गेल्या सहा वर्षांपासून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रखडून पडला होता. मात्र दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत कठोर सूचना दिल्यानंतर आता या रस्त्याच्या कामाला गती मिळू लागली आहे.

    या बैठकीनंतर सध्या हातलोट घाट परिसरात रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून पर्यावरणाच्या दृष्टीने केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रक्रिया राबवली जात आहे. लवकरच केंद्र शासनाची समिती संबंधित ठिकाणी पाहणी करणार असून समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करून रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आश्वासन दिल्याची माहिती नामदार योगेश कदम यांनी दिली.

    हातलोट घाट रस्ता हा खेड तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि पंचक्रोशीला थेट महाबळेश्वरशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. या रस्त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    याचबरोबर खोपी-शिरगाव मार्गे सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही योगेश कदम यांनी सांगितले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास लोटे एमआयडीसी आणि सातारा जिल्ह्यामधील संपर्क अधिक सुलभ होईल. त्यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला मोठी चालना मिळणार असून विस्तारित एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणण्यासाठी मदत होणार आहे.
    हातलोट घाट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील अंतर अवघ्या २५ ते ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून एम. आय. हजवानी स्कूलचा गौरव

    लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून एम. आय. हजवानी स्कूलचा गौरव

    खेड (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या विशेष परिश्रमांबद्दल तसेच प्रशालेने मिळवलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलचा गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा बुधवार दिनांक २१ मे २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

    यावेळी एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन श्री. बशीरभाई हजवानी तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सलवा तिसेकर मॅडम यांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेकडून सातत्याने केले जाणारे प्रयत्न, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनतीची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

    कार्यक्रमावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, लायन अविनाश दळवी, लायन उत्तम कांबळे सर, लायन संदीप मोरे, लायन विनोद मोरे, राठोड सर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  • महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

    महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

    नवी दिल्लीतील जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषदेत मानाचा पुरस्कार

    मुंबई: जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्लोबल एनर्जी अॅण्ड एन्व्हायरमेंट फाउंडेशनच्या (जीईईएफ) वतीने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा विद्युत क्षेत्रात मानव संसाधनातील कामगिरीसाठी ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

    ‘जीईईएफ’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६’ चे आयोजन करण्यात आले. या परिषदेत स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते व प्रामुख्याने विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता यावर विचारमंथन झाले.

    महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी ८६ हजार कर्मचारी आणि सव्वा तीन कोटी वीजग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून विद्युत सुरक्षिततेचे उपक्रम व त्यासाठी जागतिक विक्रमी लोकसहभाग, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरण, कर्मचारी संघटना संवाद-उपक्रम, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण, मानव संसाधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला कर्मचारी सन्मान व सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहन यासारखे कर्मचारी-हितैषी अनेक उपक्रम राबविले. व्यवस्थापनाच्या मंजुरीने धोरणात्मक निर्णय अंमलात आणले.

    या कामगिरीचे मूल्यमापन करून ‘जीईईएफ’च्या निवड समितीकडून जागतिक परिषदेत पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात विद्युत क्षेत्रातील मनुष्यबळ विकासाच्या योगदानासाठी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत श्री. बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्याहस्ते श्री. पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • चिपळूण: खांडोत्रीत ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध; प्रगणक आणि पर्यवेक्षकांना पाठवले माघारी

    चिपळूण: खांडोत्रीत ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध; प्रगणक आणि पर्यवेक्षकांना पाठवले माघारी

    चिपळूण: तालुक्यातील खांडोत्री येथील ओबीसी बांधवांनी शासनाच्या जनगणनेला तीव्र विरोध दर्शवला असून, जोपर्यंत ‘ओबीसी’ प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) दिला जात नाही, तोपर्यंत जनगणनेची कोणतीही माहिती न देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे माहिती गोळा करण्यासाठी गावात आलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकाऱ्यांना अखेर रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले आहे.

    शासनाकडून केल्या जाणाऱ्या जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्याने संपूर्ण समाजात सध्या तीव्र असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर खांडोत्री गावातील ओबीसी बांधव एकत्र आले आणि त्यांनी आपल्या हक्काच्या स्वतंत्र रकान्यासाठी जनगणनेच्या कामावर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय अधिकारी गावात दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांना माहिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आपल्या हक्कासाठी प्रशासनाला माघारी धाडणाऱ्या या निर्णयामुळे परिसरात सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

    या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत आणि आंदोलनात खांडोत्री गावातील अनेक प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सरपंच सौ. सोनम घाणेकर, उपसरपंच श्री. अमोल अनंत कोदारे, माजी सरपंच श्री. सखाराम सुवरे आणि कुणबी विकास मंडळ (वहाळ, मुंबई) चे अध्यक्ष श्री. अनंत कोदारे यांनी मुख्य पुढाकार घेतला.

    यावेळी श्री. दशरथ मेस्त्री, श्री. विष्णू कारेकर, श्री. शंकर जड्यार, श्री. सोमा सुवरे, श्री. सुनिल बाईत, श्री. अनंत सुवरे, श्री. जयराम सुवरे, श्री. संदीप सुवरे, श्री. मारुती कोदारे, श्री. महादेव घाणेकर, श्री. सुरेश सुर्वे, श्री. आत्माराम कातकर, श्री. शेखर गांधी, श्री. सुभाष घाणेकर, श्री. रामचंद्र सुवरे, श्री. सुरेश खांबे, श्री. दत्ताराम मेस्त्री, श्री. दौलत सुवरे आणि श्री. नंदकुमार सुवरे यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना अर्जात समाविष्ट केला जात नाही, तोपर्यंत हा विरोध असाच सुरू राहील, असा इशाराही यावेळी समस्त गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जतीन भोसलेला कांस्यपदक

    राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जतीन भोसलेला कांस्यपदक

    रत्नागिरी: पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर व लोअर एज ग्रुप ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रत्नागिरीच्या अॅक्वाटेक्निक्स रत्नागिरी स्विमिंग क्लबचा जलतरणपटू जतीन किशोर भोसले याने कांस्यपदक पटकावले.

    जतीन भोसलेने १२ वर्षांखालील गटात ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कास्यपदक मिळविले. राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत त्याने पदक मिळविल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील गुणवंत जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. उदयोन्मुख जलतरणपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जाते.

    जतीनने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. त्याच्या यशामागे प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले.

  • चिपळूण : रिया ठसाळे ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धेसाठी हाँगकाँगला रवाना

    चिपळूण : रिया ठसाळे ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स आशियाई स्पर्धेसाठी हाँगकाँगला रवाना

    चिपळूण : कापसाळ गावाची कन्या रिया ठसाळे हिने ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून तिची आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.ती स्पर्धेसाठी हाँगकाँगकडे रवाना झाली आहे.

    रिया सध्या मुंबईतील नायगाव परिसरात वास्तव्यास आहे. तिचे आई-वडील स्नेहा ठसाळे आणि सचिन ठसाळे यांचे तिच्या क्रीडा प्रवासात मोठे योगदान आहे. लहानपणापासूनच जिम्नॅस्टिक्सची आवड असलेल्या रियाने कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने तिच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.रियाच्या या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आगामी स्पर्धेत ती उत्कृष्ट कामगिरी करून भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर प्रदर्शित

    रहस्य आणि कॉमेडीचा भन्नाट तडका असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’चा ट्रेलर प्रदर्शित

    मुंबई: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला ,आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे.

    रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.

    मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे. यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झलक पाहायला मिळते. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं. मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी , ओम भुतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडीत, शार्दूल सराफ यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यातून या गोष्टीची आणि या गावाची अतरंगी झलक आपल्या बघायला मिळते. पण सोबतीनेच ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गुढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे ?तिच्या गुढतेमागची गोष्ट काय आहे ? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो. रहस्य उलगडण्याच्या प्रवासात प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ट्रेलर यशस्वी ठरताना दिसत आहे.

    दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, ”करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.”

    झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, ”तुंबाडची मंजुळा हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आहे त्यामुळे आमच्यासाठी त्याचं विशेष महत्त्व आहे. आपल्या प्रेक्षकांना एक परीपूर्ण मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकाहून एक दिग्गज कलाकार , गुढता आणि रहस्याभोवती फिरणाऱ्या गोष्टीला दिलेला विनोदाचा तडका , श्रवणीय संगीत असे मनोरंजनाचे विविध पैलू यात प्रेक्षकांना बघायला मिळतील. सध्या प्रेक्षकांना मनोरंजनासोबत काहीतरी वेगळं आणि ताजं पाहायचं आहे आणि हा चित्रपट त्याच अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल, असा विश्वास आम्हाला आहे. रहस्य, विनोद आणि कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल.”

    रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट आता ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.


  • ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कामगिरी

    ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कामगिरी

    मुंबई : मोहनलाल यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम ३’ने, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळजनक सुरुवात केली आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने, पहिल्याच दिवशी तब्बल १५.८५ कोटी रुपयांची कमाई करत सर्वांनाच थक्क केले.

    ‘सॅकनिल्क’ (Sacnilk) च्या माहितीनुसार, या चित्रपटाला त्याच्या मल्याळम आवृत्तीमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून, त्यातून १३.७० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. दरम्यान, तेलुगू आवृत्तीतून १.५० कोटी रुपये, तमिळमधून ४५ लाख रुपये आणि कन्नड आवृत्तीतून २० लाख रुपयांची कमाई नोंदवली गेली आहे.

    ‘दृश्यम ३’च्या या शानदार सुरुवातीचा परिणाम इतर चित्रपटांच्या कमाईवरही स्पष्टपणे दिसून आला. आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘पती पत्नी और वो २’ याने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी केवळ २ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याची एकूण देशांतर्गत कमाई २९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याच वेळी, सूर्याचा चित्रपट ‘करुप्पू’ याने सातव्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंतच्या त्याच्या दैनंदिन कमाईपैकी सर्वात कमी आकडेवारी ठरली. तरीही या चित्रपटाचा एकूण व्यवसाय आता ११४.०५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

    चित्रपट व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांचे असे मानणे आहे की, ‘दृश्यम ३’ला सध्या मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद या आठवड्याच्या अखेरीस (weekend) आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बॉक्स ऑफिसवरील या स्पर्धेत आणखी एका रंजक पैलूची भर घालत, अनन्या पांडेचा चित्रपट ‘चांद मेरा दिल’ हा देखील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत अनेक चित्रपटांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.