Category: बातम्या

  • महावितरणकडून सहा महिन्यात  13 हजार 722 नवीन ग्राहकांना वीज जोडणी

    महावितरणकडून सहा महिन्यात  13 हजार 722 नवीन ग्राहकांना वीज जोडणी

    रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा

    रत्नागिरी-  ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यात (१ जानेवारी ते ३० जून) रत्नागिरी परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक इतर अशा विविध वर्गवारीतील 13 हजार 722 वीज ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 8 हजार 535 ग्राहकांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 हजार 187 ग्राहकांचा समावेश आहे.

    नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.

    गेल्या सहा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात 06 हजार 755 घरगुती ग्राहकांना, 1 हजार 126 वाणिज्य ग्राहकांना, 102 औद्योगिक ग्राहकांना व 552 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणच्या  तीन विभागांपैकी रत्नागिरी विभागात सर्वाधिक 3 हजार 815 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

    सिंधुदुर्ग् जिल्ह्यात 3 हजार 940 घरगुती ग्राहकांना,  618  वाणिज्य ग्राहकांना, 84 औद्योगिक ग्राहकांना व 545 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या दोन विभागांपैकी कणकवली विभागात सर्वाधिक 2 हजार 936 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

    सध्या, महावितरण ‘कृती मानके’नुसार जिथे वीज यंत्रणा नव्याने उभी करण्याची आवश्यकता नाही अशा शहरी भागात सात दिवसांत तर ग्रामीण भागात पंधरा दिवसांच्या आत वीज जोडणी देण्यात येते. ग्राहकांना नवीन जोडणी बाबत अधिक माहिती हवी असल्यास ते नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात.

    आज ग्राहकांना घरी बसल्या, संकेतस्थळ व मोबाईल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वीज जोडणीचा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन रत्नागिरी महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

  • आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी साधता येणार संवाद; शनिवारी कार्यशाळेचे आयोजन

    आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी साधता येणार संवाद; शनिवारी कार्यशाळेचे आयोजन

    रत्नागिरी:-  फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनाइजेशन, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (एमएसएसआयडीसी) व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर्स बायर सेलर कार्यक्रमासाठी “आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद” या विषयावर शनिवार, ५ जुलै रोजी दुपारी १.३० ते ४ या वेळेत हॉटेल सावंत पॅलेस येथे उद्योगमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अ. अ. आजगेकर यांनी कळविले आहे.

    ही कार्यशाळा मुंबईत होणाऱ्या आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित केली आहे.   आंतरराष्ट्रीय खरेदीदारांची ओळख, बाजार संशोधन आणि लक्ष्यीकरणासाठी धोरणे, व्यापार व्यासपीठ, दु‌तावास आणि प्रदर्शनांचा फायदा घेणे, खरेदीदार प्रोफाइल आणि मागणी नमूने समजून घेणे,  आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद साधणे, संवाद आणि संबंध निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, वाटाघाटी तंत्र आणि सांस्कृतिक संवेदनशीलता, तुमची उत्पादने प्रभावीपणे सादर करणे आणि अपेक्षांचे व्यवस्थापन करणे, यासोबतच, आगामी रिव्हर्स बायर सेलर मीट, त्याची रचना आणि सहभागाच्या संधीबद्दल माहिती कार्यक्रमाद्वारे सादर केली जाईल. त्यामुळे हे सत्र जागतिक स्तरावर व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या एमएसएमई निर्यातदार, उद्योजक आणि भाग धारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

  • रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळली; पहाटे मार्ग खुला

    रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळली; पहाटे मार्ग खुला

    खेड :रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे सकाळी साडेसहा वाजता मार्ग पुन्हा खुला करण्यात यश आले.

    ही दरड मध्यरात्री अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास कोसळली. घाटमाथ्यावरून दगड, माती आणि झाडांचे बुंधे रस्त्यावर येऊन आडवे पडल्याने रात्रभर वाहतूक पूर्ण बंद होती. मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती सैल झाल्याने दरड कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    दरड कोसळल्याचा थेट परिणाम अकलपे येथून खेडकडे येणाऱ्या लोकवस्तीच्या एसटी बसवर झाला. या बसमधून शाळेच्या विद्यार्थ्यांसह दूध उत्पादक व भाजीपाला विक्रेते दररोज प्रवास करतात. पहाटे या बसची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे अडथळ्याचा सामना करावा लागला.

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी पहाटेपासून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून दरड हटवण्याचे काम सुरू केले. अखेर सकाळी ६.३० वाजता मार्ग मोकळा करण्यात यश आले आणि बसने खेडकडे प्रवास सुरू केला.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे डोंगर उतारांवरील झरे, वहाळ प्रवाही झाले असून माती सैल होण्याची शक्यता अधिक आहे. प्रशासनाने या पार्श्वभूमीवर घाटमार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • राज्यात तीन महिन्यांत ६६७ शेतकरी आत्महत्या

    राज्यात तीन महिन्यांत ६६७ शेतकरी आत्महत्या

    मुंबई: जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पश्चिम विदर्भात २५७, तर राज्यभरात जानेवारी ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

    राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबतचा प्रश्न डॉ. प्रज्ञा सातव, सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, संजय खोडके, अमोल मिटकरी यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला. राज्यातील दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५७शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात यवतमाळमध्ये ८१, अमरावतीत ५०, अकोल्यात ४८, बुलडाण्यात ४२, वाशीममध्ये ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीतही आत्महत्यांचे सत्र सुरूच असून प्रत्येक महिन्यात पाच शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे खरे आहे का, शिवाय या शेतकऱ्यांच्या वारसांना किती मदत केली याबाबत प्रश्न विचारला होता.

    यावर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी पश्चिम विदर्भात तीन महिन्यांत २५७ आत्महत्या झाल्या असून राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे लेखी उत्तरात सांगितले. पश्चिम विदर्भातील ७६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर ७४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती दिली. राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी ३७३ प्रकरणे पात्र, तर २०० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १९४ प्रकरणे प्रलंबित तर असून ३२७ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

  • न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बु. येथे वृक्षारोपण संपन्न

    न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बु. येथे वृक्षारोपण संपन्न

    झाडांप्रमाणे विद्यार्थांनी पर्यावरणाची सावली बनण्याची गरज:- मुख्याध्यापिका नाझीमा बांगी

    संगमेश्वर : तालुक्यातील आंबेड बू. येथे असलेल्या नवनिर्मिती फाउंडेशन संचलित न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बू. येथे गावचे सरपंच सुहास मायगडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

    न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल आंबेड बू. ही ग्रामीण भागातील शाळा असून येथे शैक्षणिक धडे गिरवले जातात पण त्याच बरोबर सामाजिक शिक्षण देण्याचे काम संस्थेच्या वतिने येथे शिक्षक वर्ग देत आहेत.समाजातील शैक्षणिक गुणवत्ता जपत. शाळेच्या वत्तीने पर्यावरनाचा होणारा ऱ्हास ही थांबवण्याचे काम सुरू आहे. विद्यार्थी वर्गात पर्यावरण बद्द्ल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली.

    यावेळी आंबेड गावाचे माजी सरपंच सुहास किंजले, विद्यमान उपसरपंच शोएब भाटकर, अनिल मोहिते, शाळेच्या मुख्याध्यापिका नाझीमा बांगी, उपमुख्याध्यापिका सुजेन अलजी, शिक्षक कौस्तुभ धनावडे, ऋषभ खंदारे, आकलीमा परदेशी, अलीशा पाठणकर, समीक्षा फेपडे, विदिशा कांबळे, कुदसीया
    तसेच सर्व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.

  • ‘लाडकी बहीण’ लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापना मार्गदर्शनसाठी पालक अधिकारी, सहायक नियुक्त

    ‘लाडकी बहीण’ लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापना मार्गदर्शनसाठी पालक अधिकारी, सहायक नियुक्त

    रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय देण्यात येत आहे, अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी तसेच संस्था स्थापन करण्यासाठी, मार्गदर्शन व सहाय करण्यासाठी पालक अधिकारी तसेच सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली.

    महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. गाव कार्यक्षेत्रासाठी 250 सभासद संख्या व दीड लाख भाग भांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी 500 सभासद संख्या व 5 लाख भाग भांडवल आणि जिल्हा कार्यक्षेत्रासाठी दीड हजार सभासद संख्या व 10 लाख भाग भांडवल असणार आहे.

    महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून साहेबराव दत्तात्रय पाटील, सहायक निबंधक सहकारी संस्था, (८२७५४५८५४४) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) भगवान कोंडीबा आखाडे, (९८६०६९२१५०) दापोली तालुक्यासाठी सहायक निबंधक अनिता बटवाल, (९८२१२८९९९१), खेड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.२) शामल क्षिरसागर, (८४११८२०१२२), चिपळूण तालुक्यासाठी सहायक निबंधक सुशांत घोलप, (९८२०६१२०२३), गुहागर तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) कुमार मनोहर देवरुखकर, (९५२७९५५९४९),  संगमेश्वर तालुक्यासाठी सहायक निबंधक, अक्षय भापकर, (७०२०४८७६९०) रत्नागिरी तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) एम. एस. धुमाळ (९९७०२०४०९९), लांजा तालुक्यासाठी सहकारी अधिकारी (श्रे.१) संतोषकुमार शि.पाटील, (९७६६९३१५८५) व राजापूर तालुक्यासाठी सहायक निबंधक संतोषकुमार शि. पाटील, ,
    (९७६६९३१५८५) यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.    

    तरी ज्या महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवावयाची असेल त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था / सहकारी अधिकारी श्रेणी-१ यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • धक्कादायक: रत्नागिरीत AI च्या मदतीने आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने ३.२० कोटींचा घोटाळा!

    धक्कादायक: रत्नागिरीत AI च्या मदतीने आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने ३.२० कोटींचा घोटाळा!

    मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट लेटरहेड, खोटी सही आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून चक्क त्यांच्याच आवाजात कॉल करून रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची फसवणूक करत ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतः आमदार लाड यांनी विधान परिषद सभागृहात ही माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील काही अधिकाऱ्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने आलेले बनावट लेटरहेड आणि खोटी सही असलेले पत्र स्वीकारले. इतकेच नव्हे तर, AI तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसाद लाड यांच्या हुबेहूब आवाजात आलेल्या फोन कॉलवर विश्वास ठेवून त्यांनी तातडीने ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यासाठी वर्ग केला.

    या घोटाळ्याची माहिती आमदार लाड यांना तेव्हा मिळाली जेव्हा रत्नागिरीतील एका अधिकाऱ्याला संशय आला आणि त्याने थेट लाड यांच्याशी संपर्क साधून खात्री करून घेतली. लाड यांच्याशी बोलल्यानंतर हा संपूर्ण फसणुकीचा प्रकार समोर आला. काल, मंगळवारी (१ जुलै २०२५) संध्याकाळी ४:३० वाजता हा AI द्वारे केलेला कॉल आला होता, अशी माहिती लाड यांनी दिली.
    बीड जिल्हा गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथील गुन्हेगारी आणि अनेक घोटाळ्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता आमदाराच्याच नावाचा वापर करून एवढा मोठा घोटाळा झाल्याने बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा अंदाज येतो.

    या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. या घोटाळ्यात चार जणांची नावे समोर आली असून, त्यापैकी एकाचे नाव बंडू असून तो सरपंच असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस अधिक तपास करत असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

    एआयच्या मदतीने होणाऱ्या अशा फसवणुकीच्या प्रकारांमुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • केंद्र सरकारची ऐतिहासिक रोजगार योजना! ELI योजनेतून 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या

    केंद्र सरकारची ऐतिहासिक रोजगार योजना! ELI योजनेतून 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या

    नवी दिल्ली: भारत सरकारने रोजगार निर्मितीसाठी आतापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. “एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI)” या प्रोत्साहन योजनेला 1 जुलै 2025 पासून सुरूवात होणार असून, ही योजना 31 जुलै 2027 पर्यंत राबवली जाणार आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच या योजनेला मंजुरी दिली असून, दोन वर्षांत 3.5 कोटी नव्या रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

    ही योजना लघु व मध्यम उद्योग (MSME), सेवा, उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्रांतील रोजगार वाढविण्यावर केंद्रित असेल. यामध्ये नोकरी देणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. विशेषतः अशा कंपन्यांना ज्या पहिल्यांदाच कामावर घेतलेल्या उमेदवारांना संधी देतील.

    केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या योजनेसाठी सरकारकडून 1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. योजना तयार करताना विविध क्षेत्रांतील तज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे.

    ELI अंतर्गत पहिल्यांदाच काम करणाऱ्या फ्रेशर्सना प्रोत्साहन दिले जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अनुषंगाने कंपन्यांना दरमहा 3000 रुपयांचे सहाय्य मिळेल. हा लाभ दोन टप्प्यांमध्ये मिळणार, पहिला टप्पा सहा महिन्यांचा, तर दुसरा बारा महिन्यांचा असेल. यामुळे तरुणांसाठी नव्या संधी उघडतील आणि औपचारिक रोजगार क्षेत्र बळकट होईल.