GRAMIN SEARCH BANNER

रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळली; पहाटे मार्ग खुला

खेड :रत्नागिरी-सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेमुळे सकाळी साडेसहा वाजता मार्ग पुन्हा खुला करण्यात यश आले.

ही दरड मध्यरात्री अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास कोसळली. घाटमाथ्यावरून दगड, माती आणि झाडांचे बुंधे रस्त्यावर येऊन आडवे पडल्याने रात्रभर वाहतूक पूर्ण बंद होती. मुसळधार पावसामुळे डोंगरातील माती सैल झाल्याने दरड कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरड कोसळल्याचा थेट परिणाम अकलपे येथून खेडकडे येणाऱ्या लोकवस्तीच्या एसटी बसवर झाला. या बसमधून शाळेच्या विद्यार्थ्यांसह दूध उत्पादक व भाजीपाला विक्रेते दररोज प्रवास करतात. पहाटे या बसची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे अडथळ्याचा सामना करावा लागला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यांनी पहाटेपासून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून दरड हटवण्याचे काम सुरू केले. अखेर सकाळी ६.३० वाजता मार्ग मोकळा करण्यात यश आले आणि बसने खेडकडे प्रवास सुरू केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे डोंगर उतारांवरील झरे, वहाळ प्रवाही झाले असून माती सैल होण्याची शक्यता अधिक आहे. प्रशासनाने या पार्श्वभूमीवर घाटमार्गांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Total Visitor Counter

2475015
Share This Article