Category: बातम्या

  • कशेडी घाटातील धोकादायक दरडींवर ‘सुरक्षा जाळी’चे कवच; प्रवाशांना मोठा दिलासा

    कशेडी घाटातील धोकादायक दरडींवर ‘सुरक्षा जाळी’चे कवच; प्रवाशांना मोठा दिलासा

    खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी घाटातील दरडी कोसळण्याच्या समस्येवर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केली आहे. घाटातील डोंगर कापलेल्या धोकादायक भागांवर आता मजबूत लोखंडी जाळी (स्टील मेश) बसवण्यात येत आहे.

    या ‘सुरक्षा कवचा’मुळे पावसाळ्यात कोसळणारे दगड आणि माती थेट महामार्गावर येण्यापासून रोखली जाणार असून, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

    कायमची डोकेदुखी आणि वाढलेला धोका

    सन २००५ पासून कशेडी घाट दरडींसाठी कुप्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे आणि अपघात घडण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कापण्यात आल्याने दरडींचा धोका काही प्रमाणात कमी झाला असला तरी, कापलेल्या उतारांवरून माती आणि दगड खाली घसरण्याचा नवीन धोका निर्माण झाला होता. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

    असे काम करते ‘सुरक्षा जाळी’

    सध्या घाटातील चोळई आणि धामणदेवी-भोगाव या सर्वाधिक दरडप्रवण क्षेत्रांमध्ये हे काम वेगाने सुरू आहे. या तंत्रज्ञानानुसार, कापलेल्या डोंगराच्या उतारावर मजबूत पोलादी जाळी घट्ट बसवली जाते. यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सैल होणारी माती आणि लहान-मोठे दगड या जाळीतच अडकून राहतात आणि थेट रस्त्यावर येत नाहीत. यामुळे महामार्ग सुरक्षित राहण्यास मदत होते.

    प्रवाशांमधून समाधान

    या मार्गावरून प्रवास करताना, विशेषतः पावसाळ्यात, दरड कोसळण्याच्या भीतीने वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. मात्र, आता या सुरक्षा जाळीच्या कामामुळे त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून स्वागत होत असून, समाधान व्यक्त केले जात आहे.

  • पुढच्या आठवड्यात ठाकरे बंधूंविरोधात न्यायालयात जाणार – गुणरत्न सदावर्ते

    पुढच्या आठवड्यात ठाकरे बंधूंविरोधात न्यायालयात जाणार – गुणरत्न सदावर्ते

    मुंबई: राज्यात 2 कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. 7 कोटी बहुभाषिक होण्यास इच्छूक आहेत. 2 कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसारखे आहेत. राज ठाकरे लक्ष द्या, मालदिवमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे.

    राज ठाकरेंच्या विचाराला पूर्ण विराम मिळाला आहे. तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे. सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे दोपहरचा सामना बंद करा, असे देखील सदावर्ते यांनी म्हटले आहे.

    राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा सक्ती लागू करण्याच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी केलेल्या विरोधावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच सदावर्ते यांनी या वादात नव्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

    डॉ. पारसनाथ तिवारी (हिंदी भाषा सेल, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सदावर्ते म्हणाले, देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे. भाषेच्या नावावर कापाकापी करणाऱ्यांना घरात बसवा. कोकणात हजारोंच्या संख्येने हिंदी भाषिक काम करतात. उद्धव ठाकरे आरशात पाहा. विनय शुक्ला हे हिंदी शिक्षक कुणाला शिकवतात, हे त्यांनी स्पष्ट करावं.

    गुणरत्न सदावर्ते हे आधुनिक अब्राहम लिंकन – पारसनाथ तिवारी

    या वेळी डॉ. पारसनाथ तिवारी यांनी म्हटले, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, सदावर्ते हे भारतीय संविधानाचं रक्षण करत आहेत. त्यांनी हिंदी विरोधात राजकारण करणाऱ्यांविरोधात जी भूमिका घेतली, ती धाडसी आहे. ते जीवाची पर्वा न करता लढत असून, ते आधुनिक अब्राहम लिंकन आहेत.

  • दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ पुस्तकाचे रायगड किल्ल्यावर प्रकाशन

    दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ पुस्तकाचे रायगड किल्ल्यावर प्रकाशन

    रत्नागिरी: स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हे संपूर्ण देशाचे श्रद्धातीर्थ आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या किल्ले रायगडाच्या पवित्र भूमीला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्याचे जाहीर होताच तिथे ‘मोरपंखी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणे हा निव्वळ योगायोग नसून, लेखक दीपक नागवेकर यांचे सद्भाग्य आहे.

    या पुस्तकाच्या प्रकाशनाला रायगडासारखे दुसरे कोणते सर्वोच्च व्यासपीठ मिळाले नसते, असे मत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या १३व्या वंशज आणि सुप्रसिद्ध अभ्यासक डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्त केले.

    रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचणे क्र. एकचे उपक्रमशील पदवीधर शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक दीपक नागवेकर यांच्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज, १३ जुलै २०२५ रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर झाले. या वेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या १३व्या वंशज व अभ्यासक डॉ. शीतल मालुसरे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे (मुंबई) अध्यक्ष सुभाष लाड, महाडचे साहित्यिक अवि जंगम, सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक सुनील कदम, निवेदक विजय हटकर, महेंद्र साळवी, प्रकाश हर्चेकर, मंगेश चव्हाण, गणेश चव्हाण, रमेश काटकर, विराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    अवि जंगम यांनी ‘मोरपंखी’चे लेखक नागवेकर यांचे कौतुक करून साहित्यविश्वात विहार करण्यासाठी नागवेकरांनी आपले पंख अधिक बळकट करावेत, असे मत व्यक्त केले.

    विद्यार्थिप्रिय उपक्रमशील शिक्षक दीपक नागवेकर प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी साहित्य-कला क्षेत्रातील आपले छंद जोपासले असून, विविध साहित्यिक संस्थांमध्ये ते सक्रियपणे काम करत आहेत. किल्ले रायगडावर प्रकाशित झालेल्या ‘मोरपंखी’ या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांचे नागवेकर यांनी आभार मानले.

  • चिपळूणमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दारूच्या नशेत एकाच्या डोक्याला घातला दगड

    चिपळूणमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी, दारूच्या नशेत एकाच्या डोक्याला घातला दगड

    चिपळूण : तालुक्यातील अलोरे-शिरगाव परिसरात दारूच्या नशेत दोन इसमांनी भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी केली. उभ्या असलेल्या तरुणाला मारहाण करून डोक्यात दगड घातल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे आणि प्रवीण शशिकांत शिंदे (दोघे रा. कळकवणे फाटा, ता. चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर या हल्ल्यात तरुणाच्या डाव्या कानाच्या वरील भागाला गंभीर दुखापत झाली आहे.

    पुष्पक नरसिंग शिंदे (वय २८, व्यवसाय-ड्रायव्हिंग, रा. नांदिवसे, राधानगर, ता. चिपळूण) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ११ जुलै रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दादर, चिपळूण येथील रामवरदायिनी मंदिरासमोरील अजित चव्हाण सलूनजवळ घडली.

    फिर्यादी पुष्पक शिंदे आपल्या भाऊ प्रसाद शिंदे, चुलत भाऊ शशांक, वैभव आणि योगेश शिंदे यांच्यासह रस्त्यावर उभे होते. यावेळी अनंत शशिकांत शिंदे आणि प्रवीण शशिकांत शिंदे (दोघे रा. कळकवणे फाटा, ता. चिपळूण) हे दारूच्या नशेत तेथे आले.

    पुष्पक शिंदे यांनी काही वेळापूर्वी प्रसाद शिंदे याच्यावर झालेल्या मारहाणीबाबत आरोपींना विचारणा केली असता, त्यांना राग अनावर झाला. त्यांनी संगनमताने पुष्पक यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आणि आरोपी अनंत शिंदे याने रस्त्यावरील दगड उचलून थेट त्यांच्या डोक्यावर फेकला. या हल्ल्यात पुष्पक यांच्या डाव्या कानाच्या वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली.

    या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या विरोधात आवश्यक कारवाई सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

  • चिपळूणमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

    चिपळूणमध्ये इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

    चिपळूण : तालुक्यातील पाग पावर हाऊस परिसरात सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामावरून एक मजूर खाली पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. संजीव रामसुरेश कुमार (वय २८, सध्या रा. खेर्डी भरणवाडी, ता. चिपळूण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते आरसीसी सेंट्रिंगचे काम करत असताना सहाव्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडले.

    ही घटना १२ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर तातडीने त्यांना अमर विश्वकर्मा यांनी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

    गणपतीपुळेहून मुंबईला जाणाऱ्या कारला फुणगुस येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

    रत्नागिरी : गणपतीपुळेहून मुंबईच्या दिशेने जाणारी बलेनो कार (क्रमांक MH04 PL 6985) फुणगुस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गाडी 40 फूट खोल दरीत कोसळली. गाडीची भीषणता पाहता मोठी दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

    ही घटना दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. आघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त कार तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली. या कामात स्थानिक तरुणांनी मोठे साहस आणि मदतीचे भाव दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली. साहिम खान, जितेंद्र थूल, कामिल मुल्ला, सुरज लांजेकर, जमीर नाईक, गजानन भोसले, सरफराज खान आणि प्रकाश भोसले या स्थानिकांनी मिळून अथक परिश्रम घेतले.

  • खेडमध्ये 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    खेडमध्ये 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    खेड : तालुक्यातील घेरा पालगड गावात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. तुषार किशोर शिंदे (२१, रा. बी. ६ सो.सा. व्हाईट अपार्टमेंट, राम मंदिर जवळ, खोपट, ठाणे; मूळ रा. घेरा पालगड, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

    ही घटना १२ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. तुषारने आपल्या मूळ गावी येऊन राहत्या घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आयुष्य संपवले.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुषार ११ जुलै रोजी ठाण्याहून कोणाला काहीही न सांगता घेरा पालगड येथे आला होता. घरच्यांपासून दूर जाऊन अचानक मूळ गावी येणे आणि त्यानंतर इतका टोकाचा निर्णय घेणे, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास सुरु असून आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील चौकशी केली जात आहे.

    या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • खेडमधील तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

    खेडमधील तरुणाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

    खेड : तालुक्यातील शिंगरी वरचीवाडी येथील कमल गणपत कदम (वय ४७) यांचा मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायावरील एका किरकोळ जखमेपासून सुरू झालेला त्रास गंभीर बनत गेल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले होते. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही जखम बरी झाली नाही. दरम्यान ७ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    १५–२० दिवसांपूर्वी कमल कदम यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ एक जखम झाली होती. पुढील काही दिवसांत पाय काळसर पडू लागल्याने त्यांना २६ जून रोजी कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत गेल्याने ३० जून रोजी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सर जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे हलवण्यात आले.

    तपासणीअंती त्यांना त्याच दिवशी सायंकाळी ५.३२ वाजता दाखल करून घेण्यात आले. तिथे त्यांच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.