गुहागर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोतळूक येथील मोरी खचली असून डांबरीकरणातच खड्डा पडला असल्याने वाहनचालकांना पटकन समजत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार घडत असून मोठी जीवितहानी झाली की संबंधित विभाग जागे होणार का? असा सवाल कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सचिन ओक यांनी सांगितले की, अंजनवेल, रानवी शृंगारतळी आबलोली रत्नागिरी या राज्य मार्गाचा दर्जा असलेल्या मार्गावर शृंगारतळी आबलोली मार्गावरील कोतळूक येथील ही मोरी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खचली होती. त्यावेळी आपण स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गुहागरकडे पाठपुरावा केल्याने संबंधित विभागाकडून तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यानंतर नवीन मोरी टाकण्याऐवजी जानेवारी २०२५ मध्ये फक्त डांबरीकरणाचा मुलामा करून संबंधित बांधकाम विभाग शांत बसले, त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी नवीन मोरी टाकण्याचे भविष्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे वारंवार सांगितले असता संबंधित ठेकेदाराला नवीन मोरी टाकण्याविषयी सूचना करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले. याविषयी कोतळूक ग्रामपंचायतीने देखील लेखी पत्राद्वारे संबंधित विभागाला कळवून देखील संबंधित बांधकाम विभागाने या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. याविषयी ज्या गांभीर्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक होते ते न देता दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली असून एखादी आपत्ती उद्भवली की प्रशासन जागे होणार काय? असा सवाल सचिन ओक यांनी केला असून आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसिलदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
Category: बातम्या
-

कोतळूक येथील मोरी खचली; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
-

गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी साहिल आरेकर यांची निवड
गुहागर : गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अध्यक्षपदी साहिल प्रदीप आरेकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, महिला आघाडी जिल्हा सचिव सौ. मनाली आरेकर, तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. शलाका काष्ट, तालुका खजिनदार दीपक शिरधनकर, महिला आघाडी तालुका सेक्रेटरी सौ. ऋशा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. साहिल आरेकर यांनी या नियुक्तीनंतर बोलताना सांगितले की, पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन. गुहागर तालुक्यात पक्ष संघटन बळकट करून, युवांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे. -

चिपळूण: कुशिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ; बिबट्याकडून गाई, वासरू, बकऱ्यांचा फडशा
शेतकऱ्यांचे नुकसान ; गावात भीतीचे वातावरण
चिपळूण: तालुक्यातील कुशिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून येथील शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्या, वासरू यांना लक्ष्य करीत असून शेतकऱ्यांची मोठे नुकसान होत असून गावात भीतीचे देखील वातावरण पसरले आहे.
या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कुशिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी केली आहे.
संतोष गोसावी यांच्यासह सहकाऱ्यांचा गेली सहा वर्षांपासून शेळी पालन व्यवसाय सुरू असून मे महिन्यापासून आतापर्यंत सलग चार बकऱ्या बिबट्याने स्पष्ट केले आहेत तसेच सुरेंद्र शिगवण, दत्ताराम शिगवण यांच्या गाईं- वासरुचा बिबट्याने हर्षा पाडला आहे गावातील शेतकऱ्यांनी आपापले बकऱ्या, गुरांचे गोठे बंदिस्त केलेले असताना देखील बिबट्याचा जनावरांवर हल्ला दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून गावात भीतीचे वातावरण देखील पसरले आहे.
याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांना मिळाल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानुसार वनपाल श्रीमती अश्विनी जाधव, पोलीस पाटील श्री. मोहिते, पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणे करत पंचनामा केला आहे. तसेच सरपंच रोशनी डिके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप डिके, ग्रामपंचायत कर्मचारी पंडव यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना सहकार्य करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. तसेच वनविभागाने बिबट्याच्या संचाराबाबत वेळीच उपाययोजना करावी,
अशी मागणी सिद्धार्थ कदम यांनी केली आहे. -

जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २७ जूनपासून रत्नागिरीत
रत्नागिरी: श्री मारुती-गणपती पिंपळपार देवस्थान आणि टिळक आळी गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने शताब्दी महोत्सवानिमित्त रत्नागिरी येथे २७ ते २९ जून या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या वर्षातील ही पहिलीच स्पर्धा असून ती आठ गटात खेळवली जाणार आहे. स्पर्धा टिळक आळी येथील गणपती मंदिराशेजारील महिला मंडळ हॉलमध्ये होणार आहे. पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, वयस्कर गट (पुरुष), कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व किशोरी गट या प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे, अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच तालुका प्रतिनिधींकडे जमा करायच्या आहेत.
या स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूंनी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. प्रवेशिकांसाठी प्रदीप परचुरे (गुहागर), विनायक जोशी (रत्नागिरी), राहुल भस्मे (देवरूख), मोहन हजारे, प्रकाश कानिटकर (चिपळूण), दीपक वाटेकर, मनमोहन बेंडके (संगमेश्वर), मनोज जाधव (लांजा), योगेश आपटे (खेड), मनोज सप्रे (राजापूर), माधव शेट्ये (दापोली) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत साई प्रकाश कानिटकर, मंदार दळवी व सागर कुलकर्णी हे प्रमुख पंच म्हणून तर मनोहर केळकर हे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
-

समुद्रातील कचरा काढण्यासाठी आता रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटी वापरणार
मुंबई: जगातील काही देशांत समुद्रातील कचरा काढण्यास यांत्रिक बोटींचा वापर होतो. असाच प्रयोग आता मुंबईत होणार आहे.मुंबई महापालिकेकडून आता समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर केला जाणार आहे.
अशा दोन बोटींची खरेदी महापालिका करणार आहे.
मुंबई महपालिकेने सफाईसाठी विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यानुसार महामार्गावरील सफाईसाठी यांत्रिक झाडूचा वापर केला जातो. तसेच नाल्यात यंदा ट्रॅश बूम बसवण्यात आले आहेत. त्यानंतर आता समुद्रातील कचऱ्यासाठी यांत्रिक बोटींचा वापर केला जात आहे.अलीकडे गेट वे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथील समुद्रात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात प्लास्टिक, शेवाळ व तरंगत्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. या कचऱ्याच्या सफाईसाठी आता रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या बोटींचा वापर केला जाणार आहे. पालिका खरेदी करणाऱ्या बोटींची किंमत पावणे तीन कोटी रुपये आहे. त्यासाठी राम इन्व्हायरो इन्फ्रा अँड एलएलपी कंपनीची निवड करण्यात आली आहे.
समुद्रातील तरंगत कचरा काढण्यासाठी एका कार्यक्षम पद्धतीची गरज होती. गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी रोज हजारो पर्यटक येत असतात. अनेकदा काही पर्यटक समुद्रातच कचरा टाकतात. तो कचरा तेथेच तरंगत राहतो. या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ‘गेट वे’चे सौंदर्य धोक्यात आले आहे. अशीच परिस्थिती बधवार पार्क येथे आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी स्वच्छतेसाठी मानवरहित पद्धतीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. -

ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदी
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हा अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सद्नभावनेनं हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक होते. त्यामुळे घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती, त्या जागेवर अभिषेकची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संचालकपद देण्यात आले आहे.
तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांना संचालक करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला का? अशी चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून संचालकपद मिळावे म्हणून तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या. काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे तेजस्वी यांच्यावर ठाकरे गट सोडण्यासाठी दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले.
प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेऊन तेजस्विनी घोसाळकर यांची निवड करण्यात आली आहे. जागा रिक्त असल्याने ती भरणं क्रम प्राप्त होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मराठी माणसं, मराठी मतदार त्यांच्याकडे आहे या भ्रमातून त्यांनी बाहेर यावे. भारतीय जनता पक्षाला मिळालेला जनाधार हा पाकिस्तानी नाही तर मुंबईतील मराठी माणसाने दिला. मराठी माणसांच्या नावाने राजकारण करायला गेल्याने लोकांचा विश्वास तुमच्यावर राहिला नाही. मराठी माणसांचा विश्वास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली. मराठी माणूस आमच्या मागे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड तुम्हाला टिकवता आला नाही तो एकनाथ शिंदे यांनी टिकवला. त्यामुळे बाळासाहेबांचा ब्रँड आमच्यासोबत आहे. राजकारणात चढ उतार येत असतात. बाळासाहेबांनी उभे केलेल्या पक्षाचा नेतृत्व हतबल झालेलं आहे.
मुंबै बँक ही मुंबईतील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट अशा विविध पक्षांशी संबंधित नेते संचालक मंडळावर आहेत. प्रवीण दरेकर हे मागील काही वर्षांपासून या बँकेच्या अध्यक्षपदी आहेत. तर, ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हे देखील संचालक मंडळावर होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील आणि लवकरच निर्णय जाहीर होईल.’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले,’ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. यासंदर्भात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील. लवकरच निर्णय जाहीर होईल.”उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी ताकत आहे. त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल.’ असेही शरद पवार म्हणाले. -

वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
रायगड: राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी राजेवाडी ते वरंध (रायगड जिल्हा हद्द) मधील रस्ता हा रस्ता अधिसूचनेच्या दिनांकापासून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीकरिता तसेच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांनी केलेल्या विनंतीनुसार तसेच पावसाळ्यामध्ये आय.एम.डी.च्या अतिवृष्टीचा इशारा (High Alert) कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याबबात जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.
त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.