Category: बातम्या

  • चिपळूणच्या ऐश्वर्या जाधवची अमेरिकेत सायबर सिक्युरिटीमध्ये गरुडभरारी!

    चिपळूणच्या ऐश्वर्या जाधवची अमेरिकेत सायबर सिक्युरिटीमध्ये गरुडभरारी!

    डी पॉल युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटी या विषयात मास्टर डिग्री

    चिपळूण: चिपळूणची सुकन्या, कु. ऐश्वर्या रश्मी रवींद्र जाधव हिने अमेरिकेतील प्रतिष्ठित डी पॉल युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटी या विषयात मास्टर डिग्री चांगल्या गुणांनी संपादन केली आहे. नुकताच तिचा पदवीदान सोहळा दिमाखात पार पडला असून, तिच्या या देदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    पाग बौद्ध कॉलनीचे रहिवासी आणि एस.टी. महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अधिकारी रवींद्र जाधव यांची ऐश्वर्या ही कन्या आहे.

    ऐश्वर्याचे शालेय शिक्षण चिपळूण येथील ख्रिस्त ज्योती स्कूल, रत्नागिरी येथील सिक्रेट हार्ट आणि अंबरनाथ येथील फातिमा हायस्कूल येथे झाले. त्यानंतर तिने मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमधून १२ वी विज्ञान शाखेत यश मिळवले. लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजमधून तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणाची आस बाळगून तिने अमेरिकेची वाट धरली आणि आता डी पॉल युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये मास्टर डिग्री मिळवून तिने चिपळूणचे नाव उज्ज्वल केले आहे.

    ऐश्वर्याच्या या प्रेरणादायी यशाबद्दल अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून, तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाने चिपळूणच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

  • रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा?

    रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावलेंची अघोरी पूजा?

    सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

    मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी काही व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता.

    यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. महत्ताचे म्हणजे सूरज चव्हाण यांनी व्हिडीओ पोस्ट करताना पालकमंत्रिपदाचा उल्लेख केला आहे.

    विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेवर आली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत अद्यापही रायगड जिल्ह्याला अद्यापही पालकमंत्री मिळालेला नाही. कारण रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर रायगडच्या पाकलमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू असल्याने अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

    सूरज चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, भरत गोगावले फक्त टॉवेलवर एका खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्यासमोर काळे कपडे घातलेला एक मांत्रिक आणि दोन वक्ती भगवी वस्र घालून उभी आहेत. याशिवाय भरत गोगावले यांच्यासमोर असलेल्या टेबलावर काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. काळे कपडे घातलेला मांत्रिक भरत गोगावले यांच्यासोबत संवाद साधून काही विधी करताना दिसत आहे. मात्र व्हिडीओमध्ये दोघांमध्ये काय संवाद होतो, हे ऐकू येत नाही. महत्त्वाचे म्हणजे सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना “बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री?” असे म्हटले आहे. याचा अर्थ रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी भरत गोगावले पूजा करत असल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केला आहे.

    दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी दावा केला होता की, 18 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी उज्जैन येथील बागलामुखी देवीच्या मंदिरात 11 महाराजांसोबत पूजा केली होती. त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून पूजा घातली होती. तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असे प्रश्न उपस्थित करत वसंत मोरे म्हणाले होते की, या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले होते आणि त्या पूजांचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत. जर गोगावले यांनी ही गोष्ट नाकारली, तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला होता. मात्र वसंत मोरे यांच्या आरोपावर भरत गोगावले यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता सूरज चव्हाण यांनी आरोप केल्यावर तरी भरत गोगावले प्रतिक्रिया देणार का? हे पाहावे लागेल.

  • कोकणातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेंटरची स्थापना होणार

    कोकणातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेंटरची स्थापना होणार

    रत्नागिरी: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. या संदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्यात चर्चा झाली.

    कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष चर्चेसाठी आमंत्रित केले होते. ही बैठक ‘सिल्व्हर ओक’ येथे घेण्यात आली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

    या दोघांमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवार आणि आमदार निकम यांनी कोकणातील पारंपरिक शेती पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, हवामानानुसार पीक पद्धती, शाश्वत शेती आणि युवकांना कृषी क्षेत्रात आकर्षित करण्याबाबत सखोल चर्चा केली. आमदार निकम यांनी कोकणातील स्थानिक शेतीच्या समस्या यावेळी सांगितल्या.

    त्यावेळी शरद पवार यांनी कृषी तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, हवामान अंदाज, पीक संरक्षण, रोबोटिक्स वापराबाबत माहिती दिली. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध भागात एआयचा वापर केल्यास शेती अर्थव्यवस्थेला महत्त्वाची मदत होऊ शकते. या चर्चेचा पुढील टप्पा म्हणून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कृषी संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागाने एक विशेष समिती लवकरच स्थापन केली जाणार आहे. त्यावेळी अत्याधुनिक एआय सेंटर उभारण्यासाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे. या घडामोडीमुळे कोकणात आधुनिक कृषी क्रांतीचा एक नवा अध्याय सुरू होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमदार शेखर निकम यांनी अशा उपक्रमांना सहकार्य देण्याची ग्वाही दिली असून, भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार शेखर निकम व जेष्ट नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

  • नागपूर-रत्नागिरी महामार्गचे काम भूसंपादन प्रक्रियेमुळे रेंगाळले, कामाला मिळाली मुदतवाढ

    नागपूर-रत्नागिरी महामार्गचे काम भूसंपादन प्रक्रियेमुळे रेंगाळले, कामाला मिळाली मुदतवाढ

    कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरीमहामार्गाच्या जिल्ह्यातील कामाला सध्या पडत असलेला पाऊस आणि जमिनी संपादन न होणे अशा अडथळ्यामुळे कामाची गती मंदावली आहे. महामार्गाचे काम सरासरी ५५ टक्के झाले आहे.

    काम वेळेत पूर्ण होत नसल्याने या रस्त्यावरून विदर्भातून कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होत आहे. मूळ रस्ता खोदला आहे. नवीन रस्ताही पूर्ण झालेला नाही. परिणामी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

    नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्याचे काम सन २०२३ पासून सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. पण कामाची गती संथ असल्याने ठेकेदार कंपनीस मुदतवाढ दिली आहे. सिमेंट क्रॉंक्रिटने रस्ता केला जात आहे. मात्र, पहिल्यापासून जिल्ह्यात रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया रेंगाळत राहिली आहे. नुकसानभरपाई देताना कमी अधिक प्रमाण झाल्याने अंकली, चोकाक, शिये येथे जमीन संपादनास बाधीत शेतकऱ्यांकडून विरोध होत आहेत.

    चोकाक ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याचे काम केवळ ५० टक्केच झाले आहे. कोकणातील मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आंबा ते पैजारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे काम ५५ टक्के झाले आहे. सरासरी जिल्ह्यात ५५ टक्केच काम झाले आहे. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत डोंगर फोडून उड्डाणपूल बांधले जात आहेत. भौगोलिक परिस्थितीमुळे कामाला गती देताना अनेक अडचणी येत आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

    १५ जुलैपर्यंत मुदत

    आंब्यापर्यंतचा पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील पैजारवाडीपर्यंतच्या भूसंपादनाची प्रक्रिया १५ जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. भू संपादनाची प्रकरणेही निकालात काढावीत, असेही त्यांनी निर्देश दिले. बैठकीस भू – संपादन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

    दृष्टीक्षेपातील महामार्ग
    – नागपूर – रत्नागिरी अंतर : ९४५ किलोमीटर
    – रूंदी : ४५ मीटर

    जिल्ह्यातील बाधीत गावे : ४९
    मंजूर निधी : ५६९८.६४ कोटी
    जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या : १२ हजार ६०८

  • रत्नागिरी-सिंधुदुर्गात पावसाचा महावितरणला फटका; ९८ हजार ग्राहक काळोखात

    रत्नागिरी-सिंधुदुर्गात पावसाचा महावितरणला फटका; ९८ हजार ग्राहक काळोखात

    रत्नागिरी: गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. कोकण परिमंडळातील या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल २२१ गावांमध्ये ९८ हजार ४०० हून अधिक वीजग्राहक बाधित झाले होते, ज्यामुळे त्यांना अंधारात राहावे लागले. मात्र, महावितरणने युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे कालपर्यंत (१८ जून) ९७ हजार ९७० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.

    १५ आणि १६ जून रोजी दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग विभागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या वादळी वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड झाली. झाडे उन्मळून पडली, दरडी कोसळल्या आणि घरांचेही नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम महावितरणच्या पायाभूत सुविधांवरही झाला.

    रत्नागिरी विभागातील ८३ गावे बाधित झाली होती, ज्यामुळे २८ हजार ९८० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेतली. या पावसामुळे बाधित झालेले ३ वितरण ट्रान्सफॉर्मर (DTC) पूर्ववत करण्यात आले आहेत. तसेच, उच्च दाब वाहिन्यांचे ७ वीजखांब आणि लघुदाब वाहिन्यांचे ३१ पैकी २८ वीजखांब पूर्ववत करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

    त्याचप्रमाणे, सिंधुदुर्ग विभागातही १३८ गावे बाधित झाली होती. तेथील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठीही महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. पावसामुळे अजूनही काही ठिकाणी किरकोळ व्यत्यय येत असले तरी, परिस्थिती लवकरच पूर्णपणे नियंत्रणात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी तात्काळ महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  • मंडणगडमध्ये ३ लाख वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू; कोकणच्या पर्यावरणाला बळ

    मंडणगडमध्ये ३ लाख वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू; कोकणच्या पर्यावरणाला बळ

    मंडणगड: निसर्गरम्य कोकणच्या पर्यावरणाला अधिक समृद्ध करण्यासाठी मंडणगड तालुक्यात एक महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. महसूल विभाग मंडणगड आणि पुणे येथील व्हीबीपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने वाकवली गावाच्या हद्दीत ५१३ एकर क्षेत्रावर ३ लाख वृक्षांची लागवड करण्याचा हा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे.
    व्हीबीपी ग्रुपच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांतर्गत हा प्रकल्प महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी १०७० झाडांची लागवड करण्यात आली. पावसाळ्यामध्येही ही मोहीम अविरत सुरू राहणार आहे.

    यावेळी प्रांताधिकारी विजयकुमार सूर्यवंशी यांनी व्हीबीपी ग्रुपच्या पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक करत, “महसूल विभागाच्यावतीने या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या प्रकल्पाची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू,” असे सांगितले. तहसीलदार अक्षय ढाकणे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आणि महसूल विभागाच्या सर्व यंत्रणा या उपक्रमासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

    या शुभारंभप्रसंगी प्रांताधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे, वनविभाग अधिकारी तौफिक मुल्ला, वाकवली सरपंच गणेश पेंढारे, पोलिस पाटील मंगेश केंद्रे, शेनाळे पोलिस पाटील अमित बैकर, तसेच व्हीबीपी ग्रुपचे संस्थापक व चेअरमन विकास बेंगडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

    २०२० पासून तयारी, राष्ट्रीय स्तरावर कोकणचे नाव उज्वल करण्याचे ध्येय

    या प्रकल्पाबद्दल बोलताना व्हीबीपी ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष विकास बेंगडे पाटील म्हणाले की, “२०२० पासून या वृक्ष लागवडीसाठी पायाभूत तयारी करण्यात आली आहे. जमिनीची पूर्वमशागत, पाण्याचे व्यवस्थापन आणि कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी अगरवूड, रक्तचंदन आणि महोगणी या तीन जातींच्या तीन लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे.” ते पुढे म्हणाले, “आमचा उद्देश केवळ झाडे लावणे हा नाही, तर लावलेल्या झाडांचे काटेकोरपणे संवर्धन आणि संगोपन करणे हा आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणाचे नाव उज्ज्वल करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
    हा प्रकल्प कोकणातील पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे परिसरातील जैवविविधतेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर: भारत-पाकिस्तान एकाच गटात

    महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर: भारत-पाकिस्तान एकाच गटात

    दिल्ली: २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच जाहीर केले आहे. १२ जून ते ५ जुलैदरम्यान रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश एकाच गटात, म्हणजेच ‘अ’ गटात करण्यात आला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींना सुरुवातीपासूनच हायव्होल्टेज सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.

    भारतीय संघाचा सलामीचा सामना १४ जून रोजी एजबॅस्टन येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघाला २१ जून रोजी हेडिंग्ले येथे दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ‘अ’ गटातील भारतीय संघाची सर्वात मोठी लढत २८ जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशिवाय आणखी दोन पात्रता फेरीतून येणारे संघ सहभागी होणार आहेत. भारताचे १७ जून आणि २५ जून रोजी होणारे सामने याच पात्र ठरलेल्या संघांविरुद्ध असतील.
    या विश्वचषकाची उपांत्य फेरीचे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी द ओव्हल मैदानावर खेळवले जातील. तर, महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर ५ जुलै रोजी रंगणार आहे. महिला क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
    या वेळापत्रकामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • शिवसेनेचे वर्धापनदिन विशेष व्यंगचित्र

    शिवसेनेचे वर्धापनदिन विशेष व्यंगचित्र

    हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, म्हणत ठाकरेंना डिवचले

    मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा वर्धापन दिन आज, गुरूवार १९ जून रोजी वरळीत साजरा केला जाणार आहे.

    या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र आपल्या समाज माध्यम खात्यावरून प्रकाशीत केले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत भरघोस मते मिळाली. तर उद्धव ठाकरे गटाला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

    शिवसेनेचा वर्धापन दिन गुरूवारी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त वरळीतील एनएससीआय डोम येथे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधित करतील. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या वर्धापन दिनाला विशेष महत्व आहे. यावेळी एकनाथ शिंदे हे पक्षाची भूमिका, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घोषीत करतील अशीही चर्चा रंगली आहे. मात्र त्याचवेळी वर्धापन दिनानिमित्त अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असा मजकूर त्यावर नमूद आहे. सोबतच शिवसेनेचा वाघ आणि सोबतच चालणारे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर भगवा ध्वज तसेच पाठीशी महाराष्ट्र दाखवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राशी जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणात सांगत असतात. तोच आशय या व्यंगचित्रातून देण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने हिंदुत्व सोडले असल्याचा आरोपही होतो, याच हिंदुत्वाचा नारा एकनाथ शिंदे यांनी यापुढेही कायम राहील, असाच संदेश या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिल्याची चर्चा रंगली आहे.