Category: बातम्या

  • मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला पुन्हा गळती; वाहनचालक हैराण, तातडीच्या उपाययोजना सुरू

    मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला पुन्हा गळती; वाहनचालक हैराण, तातडीच्या उपाययोजना सुरू

    खेड ई: मुंबई-गोवा महामार्गावरील बहुप्रतिक्षित कशेडी बोगद्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी गळती लागल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, बोगद्यातून प्रवास करताना वाहनचालकांना चक्क पावसाचा अनुभव येत असून, सिमेंटच्या बांधकामातून पाण्याचे फवारे बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

    दोन किलोमीटर लांबीचा हा कशेडी बोगदा दोन्ही बाजूकडील वाहतुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून खुला करण्यात आला आहे. भर उन्हाळ्यातही या बोगद्यात पाण्याची गळती सुरू होती. मात्र, आता पावसाळ्याला सुरुवात होताच ही समस्या अधिकच वाढली आहे. बोगद्यातून कोसळणारे पाण्याचे धबधबे आणि फवारे यामुळे वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत.

    या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी बोगद्याची पाहणी केली आहे. कशेडी बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून सध्या गळती थांबवण्यासाठी आणि वाहनांवर थेट पडणारे पाणी रोखण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या उपाययोजना किती प्रभावी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
    महामार्गावरील या महत्त्वाच्या बोगद्यातील गळतीमुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभ प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

  • घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या नावाखाली ढिसाळ कारभार; भिंत अद्याप कोसळलेलीच, ग्रामस्थ संतप्त

    घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या नावाखाली ढिसाळ कारभार; भिंत अद्याप कोसळलेलीच, ग्रामस्थ संतप्त

    राजापूर: राजन लाड/राजापूर तालुक्यातील इतिहास साक्षीदार ‘घेरा यशवंतगड’ किल्ल्याच्या दुरुस्ती दरम्यान नुकतीच एक संरक्षक भिंत अचानक कोसळली आहे. कोसळलेली भिंत ही दगडी रचना असून, अनेक दशके तग धरून उभी होती. या दुर्घटनेमुळे सुरू असलेल्या कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि नियोजनावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामस्थांच्या मते, या कामाच्या सुरुवातीला स्थानिक ग्रामस्थ, इतिहास अभ्यासक किंवा लगतच्या नाटे, साखरी नाटे या दोन्ही ग्रामपंचायतीना विश्वासात घेतलेले नव्हते. “हा लोकांच्या वारशावर लोकांशिवाय सुरू झालेला प्रकल्प आहे का?” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. एका गडप्रेमी आणि ग्रामस्थाने तर, “इथं पायवाट सुधरताना, पाखाडी बांधताना बॅनर लागतो, पण गड दुरुस्तीत एकही सूचना नाही, बॅनर नाही, लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही! हे ऐतिहासिक दुर्लक्ष नाही का?” असा सवाल उपस्थित केला आहे.

    दुरुस्तीच्या कामावेळी गडाची एक महत्त्वाची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेने कामाची दर्जा आणि पद्धत किती हलगर्जीपणाची आहे, हे अधोरेखित केले आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार जुन्या दगडांची ऐवजी नवे, मशीनी कटिंग केलेले निकृष्ट दर्जाचे जांभा दगड वापरले गेले आहेत. कोणताही प्राचीन स्थापत्यशास्त्राचा सल्ला न घेता काम सुरू झाले असावे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. तसेच, कोणतीही तांत्रिक फलक, सूचना किंवा पर्यटकांसाठी सावधानतेचे बॅनरही लावलेले नाहीत.
    खास उल्लेखनीय म्हणजे, अगदी छोट्या कामांसाठीही मोठमोठे बॅनर लावणारे प्रशासन या कामाची सुरुवात करताना कोणतेही अधिकृत उद्घाटन, माहिती फलक किंवा एकही स्थानिक प्रतिनिधींची उपस्थिती ठेवायला का विसरले, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. “दोन कुंडी खोदल्यावर उद्घाटनासाठी अनेक पुढाऱ्यांना बोलावलं जातं, बॅनर लावले जातात, मग इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामाचं भूमिपूजन गुपचूप झालं का?” असा प्रश्न विचारला जात आहे.

    दुरुस्ती वेळी ढासळलेल्या भिंतीच्या घटनेनंतर अनेक शिवप्रेमी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्यानंतर पुढील गोष्टींची मागणी होत आहे. यात कामाची तांत्रिक व आर्थिक सखोल चौकशी व्हावी, पुरातत्त्व विभागाचा थेट सहभाग असावा, स्थानीय लोकप्रतिनिधी, अभ्यासक, ग्रामस्थ यांचा सहभाग असलेली सल्लागार समिती तयार करावी, गड परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्पष्ट फलक, सूचना, प्रवेशबंदीच्या सूचना त्वरित लावाव्यात आणि ज्या ठेकेदाराने काम केले, त्याला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
    ‘संवर्धन’ आणि ‘विकास’ यामध्ये सूक्ष्म रेषा असते. घेरा यशवंतगड हे केवळ ऐतिहासिक वास्तू नाही, तर गावकऱ्यांचा, शिवप्रेमींचा आत्माभिमान आणि कोकणाच्या वारशाचं प्रतीक आहे. या गडाचे काम उत्तम दर्जाचं ऐतिहासिक खानाखुणा जतन करून करावं लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे. लोकांचा विश्वास गमावून कोणतंही जतन टिकत नाही, असे मतही ग्रामस्थ मांडत आहेत.

  • राजापूर: मुख्य रस्त्यावरील खड्डे १५ दिवसांत न भरल्यास ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

    राजापूर: मुख्य रस्त्यावरील खड्डे १५ दिवसांत न भरल्यास ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

    राजापूर : सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या राजापूर जकात नाका ते जवाहर चौक या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे पंधरा दिवसात न भरले गेल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल असा निर्वाणीचा इशारा एका निवेदनाद्वारे  राजापूर नगर परिषदेला देण्यात आला आहे . हे निवेदन  नगर पपरिषदेचे मुख्य लिपिक  जितेंद्र जाधव यांच्याकडे  गुरुवारी देण्यात आले.

    राजापूर जकात नाका ते जवाहर चौक रस्ता हा  मार्च २०२३ मध्ये सुमारे १ कोटी ७० लाख रुपये खर्चुन तयार करण्यात आला होता .मात्र गेल्या काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामध्ये या रस्त्याची वाताहात झाली असून  विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा शहरवासियांसह वाहन चालकांना खूप त्रास होत आहे. दररोज पडलेले खड्डे अधिकच रुंदावत असून त्यावरून ये जा करणे अवघड बनले आहे तर वाहन चालकांना वाहने चालवीताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्याची दखल घेतली असून गुरुवारी राजापूर नगर परीषदेवर घडक देत  निवेदन देण्यात आले. मुख्याधिकरी यांच्या अनुपस्थितीत नपचे मुख्य सचिव जितेंद्र जाधव यांनी ते निवेदन स्वीकारले. खराब बनलेल्या रस्त्याची पंधरा दिवसांच्या आत दुरुस्ती न झाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तिव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा देण्यात आला आहे. नप मध्ये निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, विनय गुरव, अनिल कुडाळी, सौ वीणा विचारे, कु. प्रतीक्षा मांजरेकर, संगीता चव्हाण,मीनाक्षी गुरव आदी उपस्थित होते.

  • रत्नागिरी: मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रगतिपथावर अनेक माईलस्टोन्स रचले – रविंद्र चव्हाण

    रत्नागिरी: मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रगतिपथावर अनेक माईलस्टोन्स रचले – रविंद्र चव्हाण

    रत्नागिरी: मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विकासाच्या प्रगतिपथावर अनेक माईलस्टोन्स रचले. हा यशस्वी प्रवास घराघरात पोहोचावा, म्हणून महाराष्ट्र भाजपा परिवाराने मोदी सरकारची आदर्श धोरणे आणि त्यांना मिळालेले यश जनतेसमोर मांडण्याचा संकल्प केला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

    या उपक्रमांतर्गत आज भाजपा रत्नागिरी जिल्हा पक्ष कार्यालय येथे आयोजित ‘मोदी सरकारच्या ११ वर्षांतील यशस्वी योजनांचे प्रदर्शन’ या विशेष कार्यक्रमाचे रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • अभिनेता ओंकार भोजने चिपळूण नगर परिषदेचा स्वच्छता दूत!

    अभिनेता ओंकार भोजने चिपळूण नगर परिषदेचा स्वच्छता दूत!

    चिपळूण  प्रतिनिधी: “स्वच्छ भारत मिशन – शहरी” अंतर्गत चिपळूण शहराच्या स्वच्छतेची मशाल आता अभिनेते ओंकार भोजने यांच्या हातात देण्यात आली आहे. चिपळूण नगर परिषदेने सामाजिक भान जपत आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या ओंकार भोजने यांची स्वच्छता दूत (ब्रँड अॅम्बेसेडर) म्हणून अधिकृतपणे नियुक्ती केली आहे.

    नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी ओंकार भोजने यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना सांगितले की, “चिपळूण शहरात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजातील प्रभावी व्यक्तींचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. ओंकार भोजने हे आजच्या तरुणाईसाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या प्रतिमेमुळे आपल्या स्वच्छता मोहिमेला नवी दिशा आणि अधिक ऊर्जा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.”

    या सन्मानाचा स्वीकार करताना अभिनेते ओंकार भोजने यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चिपळूणकरांसोबत मिळून हा उपक्रम आणखी प्रभावी करण्यासाठी मी माझं पूर्ण योगदान देईन.”

    आगामी काळात चिपळूण शहरात स्वच्छतेसाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत, ज्यात ओंकार भोजने सक्रियपणे सहभागी होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे या मोहिमेला अधिक गती मिळेल आणि चिपळूण शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • खेड : भाजी मार्केटमधील स्लॅब कोसळला; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

    खेड : भाजी मार्केटमधील स्लॅब कोसळला; पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

    खेड: कोकणातील महत्त्वाचे मानले जाणारे खेड शहरातील छत्रपती संभाजी भाजी मार्केट सध्या धोकादायक स्थितीत असून, येथील गेट क्रमांक दोनचा स्लॅब कोसळल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी, मार्केटमधील उर्वरित स्लॅबही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिक रोज या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी छत्रपती संभाजी भाजी मार्केटच्या गेट क्रमांक दोनचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी त्यावेळी कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मार्केटमधील इतर स्लॅबचीही अवस्था अत्यंत वाईट असून, ते कधीही कोसळू शकतात, अशी भीती भाजी विक्रेते व्यक्त करत आहेत. भाजी विक्रेत्यांनी अनेक वेळा खेड नगरपालिका प्रशासनाकडे या धोकादायक स्थितीबाबत तक्रारी केल्या आहेत. मार्केटच्या दुरुस्तीची आणि स्वच्छतेची मागणी वारंवार करण्यात आली आहे, परंतु पालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.

    केवळ स्लॅब कोसळण्याचा धोकाच नाही, तर मार्केटमधील गटारांचीही दुरवस्था झाली आहे. गटारे तुंबली असून, त्यांचे पाणी रस्त्यावर साचले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूसारखे साथीचे आजार पसरण्याची भीती विक्रेते व्यक्त करत आहेत. एका भाजी विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत. नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये येत आहेत. खेड तालुक्याला भाजीपाला पुरवठा याच मार्केटमधून होतो, तरीही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.” असे एका नागरिकाने सांगितले.

    मार्केटच्या पाठीमागील बाजूस नव्याने बांधलेल्या गटारांचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याने पाणी साचत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच, मार्केटमध्ये स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी येत नसल्याने सर्वत्र कचरा आणि घाण साचली आहे. यापूर्वी मार्केटमध्ये कचरा गोळा करण्यासाठी जी १७ नंबरची गाडी उभी असायची, ती देखील आता उपलब्ध नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

    या गंभीर परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणताही उपयोग होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि विक्रेते संतापले आहेत. खेड शहराबरोबरच संपूर्ण खेड तालुक्यासाठी ही भाजी मंडी अत्यंत महत्त्वाची असल्याने, नगरपालिका प्रशासनाने आता तरी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

  • “ऑपरेशन सिंदूर”वर अविनाश धर्माधिकारी यांचे चिपळूणमध्ये अभ्यासपूर्ण व्याख्यान

    “ऑपरेशन सिंदूर”वर अविनाश धर्माधिकारी यांचे चिपळूणमध्ये अभ्यासपूर्ण व्याख्यान

    चिपळूण प्रतिनिधी: चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ‘श्रावणानंद’ या विशेष उपक्रमांतर्गत, माजी सनदी अधिकारी (आयएएस) आणि चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक, श्री. अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर : पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर एक अभ्यासपूर्ण आणि मार्मिक विश्लेषण करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे महत्त्वपूर्ण व्याख्यान मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ ते ८ या वेळेत चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.

    ‘ऑपरेशन सिंदूर’ हा विषय अनेक दृष्टीने महत्त्वाचा आणि समाजमनावर परिणाम करणारा ठरला आहे. या विषयाची ऐतिहासिक पूर्वपीठिका आणि त्याचे सद्यस्थितीतील उत्तरदायित्व यावर अविनाश धर्माधिकारी त्यांच्या ओघवत्या शैलीत आणि मुद्देसूद मांडणीने प्रकाश टाकणार आहेत. धर्माधिकारी हे प्रशासकीय अधिकारी म्हणून मिळालेला अनुभव आणि त्यांचे सखोल चिंतन यासाठी ओळखले जातात. त्यांच्या व्याख्यानातून या विषयाचे विविध पैलू उलगडले जातील, ज्यामुळे उपस्थितांना एक व्यापक दृष्टीकोन मिळेल अशी अपेक्षा आहे.

    चतुरंग प्रतिष्ठानने ‘श्रावणानंद’ या उपक्रमांतर्गत नेहमीच विविध विचारप्रवर्तक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. समाजाला दिशा देणारे आणि महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा घडवून आणणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अविनाश धर्माधिकारी यांच्यासारख्या प्रज्ञावंत व्यक्तीमत्त्वाला ऐकण्याची संधी चिपळूणकरांना यानिमित्ताने मिळत आहे.

    या व्याख्यानासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे चिपळूण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी, अभ्यासकांनी तसेच या विषयाची सखोल माहिती करून घेण्यास उत्सुक असलेल्या सर्व रसिकांनी वेळेवर उपस्थित राहून या विचारप्रवर्तक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे. ‘दिव्यरत्नागिरी’ने या कार्यक्रमाला विशेष प्रसिद्धी दिली आहे.

  • राजापूर: मुर येथे डुक्कराच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी

    राजापूर: मुर येथे डुक्कराच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी

    राजापूर : तालुक्यातील मुर येथील कनिष्ठ महाविद्यालयाजवळ रस्त्याने चालत जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला जंगली डुक्कराने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यश अनंत साळवी (वय १७, रा. मुर, ता. राजापूर) असे जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी (१८ जून २०२५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, यश साळवी आणि त्याचा मित्र पार्थ पाष्टे हे दोघे सकाळी सरस्वती विद्यालय-पाचल येथे अकरावीच्या प्रवेशाची माहिती घेण्यासाठी मुर गावातून जात होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलमय भागातून ते जात असताना, अचानक एका जंगली डुक्कराने यश साळवीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यश जागेवरच कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तात्काळ लक्षात आले.

    अपघातानंतर त्याला तातडीने रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

    जंगल भागातून शहरांकडे किंवा मानवी वस्तीकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे होणारे अपघात वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.