देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहराच्या अगदी शहरी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन शहराच्या मध्यवर्ती भागात वारंवार होत असल्याची चर्चा असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या दहशतीमुळे देवरुखच्या नागरिकांनी वनविभाग अधिकारी (संगमेश्वर-देवरुख) यांना तातडीने कार्यवाही करण्याची मागणी गाव समितीने केली आहे.
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. विशेषतः महिला आणि लहान मुले सायंकाळच्या वेळी
घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ले केल्याच्या घटनांची जोरदार चर्चा असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जंगल भागातून मानवी वस्तीत बिबट्याचा हा वाढता वावर पाहता, कोणत्याही क्षणी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गाव विकास समितीने वनविभाग अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बिबट्याच्या या गंभीर बाबीची वनविभागाने त्वरित दखल घ्यावी. शहरात आणि बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असलेल्या वस्त्यांमध्ये वनविभागाची गस्त तातडीने वाढवण्यात यावी.” तसेच, केवळ गस्त वाढवून न थांबता, “परिस्थितीचे योग्य निरीक्षण करून बिबट्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन गाव समितीच्या वतीने सौ. अनघा कांगणे, सौ. दिक्षा खंडागळे, नितीन गोताड आणि महेंद्र घुग यांनी दिले आहे. वनविभाग कार्यालयाने नागरिकांच्या मागणीची गांभीर्याने नोंद घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, जेणेकरून देवरुखकरांना या बिबट्याच्या दहशतीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे.