GRAMIN SEARCH BANNER

नमन लोककला संस्थेची २०२५-२८ कार्यकारणी जाहीर; कोकण कलाविश्वातील संघर्षशील नेतृत्व रवींद्र मटकर पुन्हा अध्यक्षपदी

Gramin Varta
224 Views

मुंबई/ उदय दणदणे: नमन लोककला आणि लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी शासन स्तरावर सातत्याने संघर्ष करून राज्य शासनाला नमन महोत्सव सुरू करण्यास भाग पाडणाऱ्या ‘नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र अखंड भारत (रजि.)’ या अग्रगण्य संस्थेच्या २०२५ ते २०२८ या त्रैवार्षिक कार्यकाळासाठी नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी परळ, मुंबई येथील वाघे हॉलमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष जनरल सभेत ही निवड सर्वानुमते पार पडली.

या विशेष सभेत मागील तीन वर्षांचे इतिवृत्त आणि कार्य अहवाल तसेच मागील आर्थिक वर्षाचा जमा-खर्च सादर करून त्याला मंजुरी घेण्यात आली. त्याचबरोबर आगामी वार्षिक नमन जागर कार्यक्रमाच्या नियोजनावर विचारविनिमय करून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. या सभेत सर्वानुमते निवडण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीमध्ये रवींद्र मटकर (राजापूर) यांची अध्यक्षपदी, रमाकांत जावळे (चिपळूण) आणि राजाराम फापे (लांजा) यांची उपाध्यक्षपदी, शाहिद खेरटकर (चिपळूण) यांची सरचिटणीसपदी, सुधाकर मास्कर (गुहागर) आणि तुषार पंदेरे (लांजा) यांची सहसचिवपदी, तर दिपक कारकर (चिपळूण) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. तसेच प्रकाश मालप (रत्नागिरी), सागर डावल (गुहागर) आणि प्रशांत भेकरे (गुहागर) यांची सदस्यपदी निवड झाली. नूतन कार्यकारिणी निवड झाल्यानंतर अध्यक्ष रवींद्र मटकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या वतीने लवकरच नमन जागर-२०२५-२६ तसेच नमन लोककलावंत परिषद यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. सभेत नमन लोककला संवर्धनासाठी तसेच लोककलावंत व संस्थेच्या हितासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्या आणि काही महत्त्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले. या सभेला नमन लोककला संस्थेचे मुंबई शाखा अध्यक्ष चंद्रकांत धोपट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, गुहागर शाखेचे सदस्य अमित काताळे, खजिनदार उदय दणदणे, राजापूर शाखा मुंबईचे अध्यक्ष सुरेश मांडवकर आणि खजिनदार पिंकेश बापर्डेकर आदी शाखांचे पदाधिकारी, सदस्य, नमन मंडळाचे प्रतिनिधी तसेच कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3199525
Share This Article