GRAMIN SEARCH BANNER

कोकणात सागरी कासवांच्या विणीला प्रारंभ; गुहागर किनाऱ्यावर सापडले पहिले घरटे

Gramin Varta
136 Views

गुहागर: कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी गुहागर किनाऱ्यावर मिळाले.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. समुद्री कासवांमधील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. हिवाळ्याच्या तोंडावर सागरी कासवांच्या विणीला सुरुवात होते. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी ३० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण २० किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.

गुहागरचा किनारा हा महाराष्ट्रात सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी ३४२ घरटी आढळून आली होती. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामातील पहिले घरटे सोमवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आल्याची माहिती रत्नागिरी कांदळवन कक्षाच्या दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. यामध्ये आढळलेल्या ११८ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी वेळणेश्वर किनाऱ्यावर अंडी न घालताच एक मादी समुद्रात गेली होती. त्यामुळे हीच मादी गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुहागर किनाऱ्यावर ११ कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, यंदा पाच हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कासव संवर्धनाच्या कामातून कोकण किनारपट्टीवरुन समुद्री कासवांची १ लाख ७१ हजार २४५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ९२९ घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या जन्म होण्याचा दर ७० टक्के होता.

Total Visitor Counter

3377461
Share This Article