GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : रेहेळमध्ये दोन गटात राडा; दुचाकीचा आरसा लागल्याच्या वादातून हाणामारी, दोन्ही बाजूंच्या सहा जणांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
21 Views

चिपळूण: तालुक्यातील रेहेळ येथे दुचाकीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या राड्यामध्ये लाकडी बॅट, लोखंडी कडे आणि कोयत्याचा वापर करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी एकूण सहा जणांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश पांडुरंग शेलार हे पूजेच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना समोरून दुचाकीवरून येणारे महेंद्र तुकाराम बामणे यांच्या गाडीचा आरसा त्यांच्या दंडाला लागला. यावरून विचारणा केली असता वादावादी होऊन महेंद्र बामणे यांच्यासह अभिषेक बामणे, तन्मय बामणे, राजेंद्र बामणे आणि सुशांत बामणे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रुपेश शेलार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अभिषेक बामणे याने लाकडी बॅटने तोंडावर व बरगडीवर मारून गंभीर दुखापत केली, तर तन्मय बामणे याने कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी महेंद्र बामणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, महेंद्र तुकाराम बामणे यांनीही रुपेश शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कामावर जात असताना गाडीचा आरसा लागल्याच्या कारणावरून रुपेश शेलार यांनी जोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा अभिषेक याची कॉलर पकडून त्याला मारहाण करण्यात आली. तसेच रुपेश शेलार यांनी हातातील धातूच्या कड्याने महेंद्र बामणे यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जखमी केले. या झटापटीत अभिषेक याच्या हातातील चांदीची अंगठीही गहाळ झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी रुपेश शेलार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून दोन्ही बाजूचे जखमी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. एका छोट्याशा वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याने गावात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3377500
Share This Article