GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : हरवलेली मतिमंद महिला माहेर संस्थेकडून नातेवाईकांच्या ताब्यात

Gramin Varta
767 Views

रत्नागिरी: निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्था (हातखंबा) येथे चार दिवसांपूर्वी मंगल ही अनोळखी महिला दाखल झाली होती. ती संस्थेने तिच्या नातेवाइकांकडे सुखरूप सुपूर्द केली.

मंगल ही महिला रात्रीच्या वेळेस निवळी ते हातखंबा महामार्गावर एकटीच भटकत होती. निनावी फोनद्वारे ही माहिती माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांना कळाली. त्यांनी त्या अनोळखी महिलेला आश्यक असलेला सहारा आणि पुनर्वसनाची गरज ओळखून माहेर संस्थेत तिला दाखल करण्याची कार्यवाही केली. तिचा पत्ता व इतर नातेवाईकांचा शोध माहेर संस्था घेत होती. ग्रामीण पोलीस ठाण्यातही ही महिला मिळाल्याबाबतचे पत्र देण्यात आले.

दरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मंगल बाबाजी शितप ही चाळीस वर्षांची महिला बेपत्ता असल्याचे सुनील कांबळे यांना कळाले. तत्काळ त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला व मंगल या अनोळखी महिलेच्या नातेवाईकांचा शोध लागला. ही महिला मतिमंद असल्याने वाडीवस्तीत भटकत असते. परंतु ती प्रथमच इतक्या लांब भटकत आल्याचे नातेवाईकांनी संस्थेला सांगितले.

नातेवाईकांची खातरजमा करून त्या महिलेला तिची आई वंदना बाबाजी जाधव व इतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ती एका आठवड्याने नातेवाईकांना मिळाल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. रस्ता चुकलेल्या व हरवलेल्या महिलेला तिचे घर व नातेवाईक मिळणे ही आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे, असे मत माहेर संस्थेचे अधीक्षक, प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3123055
Share This Article