GRAMIN SEARCH BANNER

‘फूड ऑन ट्रॅक’: आता प्रवाशांना रेल्वेगाडीत झटपट जेवण मागवता येणार

Gramin Varta
30 Views

दिल्ली: प्रवाशांची रेल्वेतच झटपट जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ‘फूड ऑन ट्रॅक’ ॲप सुरू केले असून आता प्रवाशांना प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ मागवता येतील.

ऑनलाइन पद्धतीने किंवा रोख पैसे देऊन प्रवाशांना हवे ते खाद्यपदार्थ उपलब्ध होतील.

आयआरसीटीसीने प्रमुख ई-कॅटरिंग सेवेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा आणि पर्याय उपलब्ध करून दिला. या सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान विश्वासार्ह ब्रँड्स व अधिकृत उपहारगृहामधून आपल्या पसंतीचे खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत. याआधी आयआरसीटीसीने ई-कॅटरिंग सेवा सुरू केली होती. एसएमएस व कॉल सेंटरच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्याची सुविधा उपलब्ध झाली होती.

आता ही सेवा ई-कॅटरिंग या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ मोबाईल ॲप आणि व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागवता येतील. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात आहे. जेवणाची मागणी प्रवासी व विक्रेत्यांना एसएमएस व इ-मेलद्वारे पुष्टी संदेश पाठविण्यात येतो. सुरक्षित व अचूक डिलिव्हरीसाठी ओटीपी आधारित प्रणाली राबविण्यात येत आहे, त्याद्वारे अन्न थेट प्रवाशाच्या आसनावर पाठवण्यात येतील.

सध्या आयआरसीटीसी ई-कॅटरिंग सेवा देशभरातील ३०० हून अधिक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे. या सेवेअंतर्गत प्रवाशांना भारतीय, दक्षिण भारतीय, चायनीज, कॉन्टिनेंटल, तसेच बिर्यानी व इतर स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. आयआरसीटीसीने विविध नामांकित ब्रँड्सचे खाद्यपदार्थ पोहचवण्यासाठी ॲग्रीगेटर्ससोबत भागीदारी केली आहे. समूहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे.

१५ किंवा त्याहून अधिक प्रवासी असलेल्या गटांसाठी त्यांच्या निवडीचे खाद्यपदार्थ, योग्य दर आणि रेल्वे आसनावर खाद्यपदार्थ पोहचविण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवा कौटुंबिक सहली, गट पर्यटन करणाऱ्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशात दररोज सुमारे १.२० लाख पाकीट जेवणाची मागणी आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंगद्वारे घेतली जाते. यामध्ये आयआरसीटीसी पश्चिम विभागाचा मोठा वाटा असून येथे दररोज सुमारे ३५ हजार पाकीट जेवणांची मागणी होत असते. पश्चिम विभागामध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेवरील १०० हून अधिक स्थानकांवर, २०० पेक्षा अधिक अधिकृत विक्रेते व ॲग्रीगेटर्स यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3209948
Share This Article